मांग-गारोडी समाजातील नागरिकांना मिळणार हक्काचा निवारा

0
14
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया, दि.27 :- कुडवा (गोंदिया) येथील अण्णाभाऊ साठेनगर येथे मांग-गारोडी समाज मागील 25 ते 30 वर्षापासून वास्तव्यास असून हा समाज अशिक्षीत व समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. त्यांचे अत्यंत हलाखीचे जीवन आहे. विशेष समाज कल्याण विभागाच्या विशेष पुढाकाराने या वस्तीत सुविधांचा जणू मोगरा फुलला आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरीता रमाई आवास योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नक्षलग्रस्त व दुर्गम क्षेत्रातील नागरिकांना घराच्या बांधकामाकरीता 1 लाख 30 हजार रुपये टप्प्या-टप्प्याने अनुदान देण्यात येते. सन 2021-22 मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत मांग-गारोडी समाजातील 25 कुटूंबाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते.

         या 25 कुटूंबांचा रमाई आवास योजनेंतर्गत सामुहिक भूमिपूजन सोहळा 25 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर घरकुलांचे भूमीपूजन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, समाज कल्याण विभागाचे संगणक ऑपरेटर लक्ष्मण खेडकर, समाज कल्याण निरीक्षक स्वाती कापसे, कनिष्ठ लिपीक अमेय नाईक, मांग-गारोडी समाजाचे विजय पात्रे, वंदना पात्रे, किशोरकुमार कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

        यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी या समाजाच्या इतर समस्या जसे- काही लोकांना जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणे, घरकुल योजनेचा लाभ इत्यादी बाबत त्यांच्या जवळ बसून चर्चा केली. शक्य तितक्या लवकर त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे असे आश्वासन विशेष समाज कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आले.

        सदर वस्तीसाठी विशेष समाज कल्याण विभागाच्या वतीने प्रत्येक योजना सामाजिक न्याय विभागाच्या त्यांच्या दारात पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा लक्ष्मण खेडकर व तत्कालीन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखडे यांचे या वस्तीत व्यक्तीश: लक्ष्य तसेच विद्यमान समाज कल्याण सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांच्या प्रयत्नाने ही वस्ती आता समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडली जात आहे.