मोदी सरकार ‘इंडिया’आघाडीला घाबरले-माजी मंत्री सतिश चतुर्वेदी

0
8

गोंदिया : नेमकी ‘इंडिया’ आघाडीची मुंबईतील पूर्वनियोजित बैठक सुरू असतानाच संसदेच्या ५ दिवसीय विशेष अधिवेशनाची घोषणा करण्यात आली, विषय मात्र सांगितले नाही. या विशेष अधिवेशनात मुदतपूर्व निवडणुकांवर चर्चा, एक देश एक निवडणूकवर चर्चा आणि ‘इंडिया’ला भारत करण्याविषयी चर्चा, असे पिल्लू सोडून देण्यात आले. यावरुन केंद्रातील मोदी सरकार ‘इंडिया’आघाडीला घाबरल्याचे दिसते आहे, अशी टीका माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी केली.पत्रपरिषदेला आमदार अभिजीत वंजारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, विनोद जैन, प्रदेश सचिव अमर वऱ्हाडे, राजीव ठकरेले,निलम हलमारे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेसाठी गोंदिया जिल्ह्यात आले असता ते पत्रपरिषदेत बोलत होते. आगामी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड जिंकून प्रथम ट्रेलर आणि २०२४ मध्ये पूर्ण पिक्चर दाखविणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या भारतात एकमेकांबद्दल द्वेषाची बीजे पेरली जात आहेत. मणिपूर येथे लज्जास्पद घटना घडत आहेत. भाजपच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात बेरोजगारांना नोकऱ्या देण्याच्या नावाखाली लूट सुरू आहे. महागाईने सर्वसामन्यांचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी इतिहास रचला आहे. आता तर राज्यघटनेत नमूद केलेला ‘इंडिया’ हा शब्दही बदलण्याचे काम सुरू आहे. जनतेच्या विकासापासून कोसो दूर असलेले असे राजकारण भारताची स्थिती आणि दिशा बदलत आहे.

‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर प्रवास करू शकणार नाहीत, असे काही विरोधक म्हणायचे. पण राहुल गांधींच्या यात्रेने काँग्रेसला ऊर्जा, आत्मविश्वास व नवसंजीवनी दिली. या प्रवासाचा परिणाम आपण कर्नाटक निवडणुकीत पाहिला. या सरकारने २०२१ मध्ये जनगणना होऊ दिली नाही. अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता होती, मात्र त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती. काँग्रेसच्या काळात स्वयंपाकाचा गॅस ४०० रुपयांपर्यंत होता, तर गरिबांसाठी डाळही स्वस्त होती. देशातील सर्वधर्मांच्या समानतेचा विचार घेऊन आम्ही आता पुढे जात आहोत. प्रत्येक गावात जनतेत लोकसंवादातून जनजागृती केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.