अर्जुनी मोर,दि.10-केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असून केंद्रातील मोदी सरकार व महाराष्ट्रात खोक्यातून निर्माण झालेल्या ईडी सरकारलाही सत्तेतून खाली खेचा असे प्रतिपादन इटखेडा येथील बाजार चौकात गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित जनसंवाद यात्रेप्रसंगी इंद्रदास झिलपे यांनी केले.ते पुढे बोलताना म्हणाले की मोदी सरकारच्या काळात प्रचंड महागाई वाढली.पेट्रोल डिझेल एलपीजी गॅस खाद्यतेल व इतर योजना वस्तू यांचे भाव गगणाला भिडले.वर्षाला दोन कोटी रोजगाराचे आश्वासन देणार्या मोदी सरकारने नोकर्या संपवून बेरोजगारीने उच्चांक गाठला.शेती उपयोगी साहित्यांचे दर वाढविले शेतकऱ्यांच्या शेतमालाला कधीही हमीभाव मिळाला नाही.उलट शेती साहित्यावर 18% जीएसटी लावून वर्षाला सहा हजार रुपये शेतकरी सन्मान योजनेद्वारे देऊन योजना राबवल्याचा ढोल बडवत आहे.जीएसटीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना सुद्धा उद्ध्वस्त केले.विविध प्रकल्प विमान कडे बँका विमा कंपन्या विविध सहकारी संस्था उद्योगपतींना विकण्याचा मोदी सरकारने सपाटा लावला आहे भ्रष्टाचारांनी बरबटलेल्या नेत्यांना मोदींनी आपल्या पक्षात प्रवेश देऊन पवित्र केल्याचेही झिलपे म्हणाले. या जनसंवाद यात्रेनिमित्त यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम धामट,माजी उपसभापती आशा झिलपे,अनिल दहिवले,जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे,नूतनताई दहिवले,पंचायत समिती सदस्य भाग्यश्री सयाम, सोमेश्वर सौंदरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.