नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्हांचा दौरा करणार असून या दरम्यान त्या विविध ठिकाणी भेट देणार व काही मान्यवरांच्या भेटी घेणार आहेत. सोबतच तिन्ही जिल्हातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार. १ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर असा तीन दिवसांचा त्यांचा हा विदर्भ दौरा राहणार असून त्यांच्यासोबत पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे प्रदेश पदाधिकारी उपस्थीत राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी दिली आहे.
रविवारी त्यांचे नागपूर येथे आगमन होणार असून दुपारी १२.३० वाजता दिक्षाभूमिला भेट देणार आहेत. यानंतर स्वागत लॉन, सिव्हील लाईन येथे दुपारी २ वाजता पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. शहरातील विविध समविचार ज्येष्ठ विचारवंतांसोबत रविभवन येथे बैठक घेवून चर्चा करणार आहेत. रविवारी त्यांचा नागपूर येथेच मुक्काम असून २ ऑक्टोबर रोजी सोमवारला त्या सकाळी वर्धा जिल्हाच्या दौऱ्यावर निघणार आहे.
सकाळी त्या ९ वाजता पवनार आश्रमाला भेट देणार आहेत. सकाळी १० वाजता सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देवून गांधी जयंती निमित्त त्या महात्मा गांधी यांना अभिवादन करणार आहेत. यानंतर सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक करणार आहेत. दुपारी १२ वाजता वर्धा येथील विश्रामगृहात त्या काही सामाजिक संघटनांसोबत चर्चा करून दुपारी २ वाजता वर्धा येथील सिव्हील लाईन स्थित महात्मा सभागृहात जिल्हातील प्रमुख पदाधिकारीऱ्यांसोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. ४.३० वाजता पत्रकार परिषद घेवून नंतर ज्येष्ठ गांधीवादी नेते स्व. वसंतराव कारलेकर यांच्याकडे भेट देवून नंतर अमवराती येथे मुक्कामी जाणार आहेत.
३ ऑक्टोबर रोजी मंगळवारला सुप्रिया सुळे सकाळी ८.३० वाजता अंबादेवी व एकविरा देवीचे दर्शन घेवून सकाळी ११ वाजता कॅम्प रोडवरील नवीन शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करणार. दुपारी १२ वाजता राजापेठ येथील शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन करतील. दुपारी २ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक भवन मोर्शी रोड येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. नंतर त्या नागपूर येथे येवून पुण्याकडे रवाना होणार आहेत. सुप्रिया सुळे यांच्या या दौऱ्यामुळे विदर्भातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना एक नवीन ऊर्जा निर्माण करण्याचा उद्देश्य आहे.