“…तर निवडणूक आयोगाला मारझोड केली पाहिजे”, ॲड. प्रकाश आंबेडकर

0
9

अमरावती : खासदार किंवा आमदार दिवंगत झाल्‍यानंतर सहा महिन्‍याच्‍या आत त्‍या ठिकाणी पोटनिवडणूक घेणे कायद्याने बंधनकारक असताना निवडणूक आयोग त्‍या टाळून संवैधानिक चौकट मोडायला निघाले आहे. जबाबदारी पार पाडता येत नसेल, तर राजीनामा द्या आणि मोकळे व्‍हा किंवा तत्‍काळ पोटनिवडणुका घ्‍या, असे आपले निवडणूक आयोगाला आवाहन आहे. या दोन गोष्‍टी झाल्‍या नाहीत, तर ज्‍या-ज्‍या ठिकाणी निवडणूक आयोग जाणार आहे, त्‍या ठिकाणी जनतेने निदर्शने केले पाहिजेत, मोर्चे काढले पाहिजेत आणि तेही करून ऐकत नसतील, तर निवडणूक आयोगाला मारझोड सुद्धा केली पाहिजे, असे वक्‍तव्‍य वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले.प्रकाश आंबेडकर म्‍हणाले, निवडणूक आयोगाला निवडणुका पुढे ढकलण्‍याचा अधिकार नाही. निवडणूक आयोग स्‍वायत्‍त आहे. उच्‍च न्‍यायालयाने निवडणूक घेण्‍याचे आदेश देऊनही त्‍याचे पालन केले जात नाही. निवडणूक आयोगाचा कारभार हा सरकारच्‍या इशाऱ्यावर सुरू आहे.

निवडणूक आयोग जर आपली जबाबदारी पार पाडत नसेल, तर त्‍यावर जाब विचारण्‍याचा अधिकार हा जनतेला आहे. कारण जनता ही या देशाची मालक आहे. निवडणूक आयोग ऐकत नसेल, तर मारझोड सुद्धा केली पाहिजे. मारझोड करणे म्‍हणजे कायदा हातात घेणे नव्‍हे. कायद्याची अंमलबजावणी करणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. ते काम जर प्रामाणिकपणे करणार नसतील आणि त्‍या विरोधात जर जनतेने उठाव केला, तर त्‍यासाठी निवडणूक आयोगच जबाबदार राहील.निवडणूक‍ आयोगाने दिवंगत झालेल्‍या लोकप्रतिनिधीच्‍या मतदार संघांमध्‍ये ताबडतोब निवडणुका घेतल्‍या पाहिजेत. लोकांचा संताप वाढला तर लोक आवाज उठवतील आणि त्यावेळी तुम्‍हाला वाचविण्‍यासाठी आज तुम्‍ही ज्‍यांना वाचवत आहात, तेही येणार नाहीत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.