तहसीलदारांनी न्याय देण्याऐवजी…शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी केला गुन्हा दाखल

0
195

यवतमाळ: शेतातील नाला वळविण्यात आल्याने पिकांचे नुकसान झाले. वारंवार मागणी करून न्याय मिळत नसल्याने शेतकर्‍याने आर्णी तहसीलदार परशराम भोसले यांच्या कक्षात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तहसीलदारांनी शेतकऱ्याला न्याय देण्याऐवजी त्याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. आर्णी तहसील प्रशासनाच्या या कारभाराविरोधात सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.गौतम गेडे (रा. जवळा, ता. आर्णी) असे विष प्राशन करणाऱ्या शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांनी नववर्षच्या पहिल्याच १ जानेवारी रोजी आर्णी तहसीलदार परशराम भोसले यांच्या कक्षात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तहसीलदार भोसले यांनी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावर आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी संताप व्यक्त केला.अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांशी सन्मानाने वागावे, असा इशारा त्यांनी दिला आहे. अधिकार्‍यांनी शेतकर्‍याची बाजू घेतली असती तर, ही वेळ आली नसती. आता अधिकार्‍यांनी पंचनामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

आर्णीच्या तहसीलदारांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी गौतम गेडे यांनी भगिनी श्‍वेता डेरे यांनी केली आहे. तहसीलदारांची बदली करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी दिला आहे. प्रशासकीय कामकाजाचा फटका जिल्ह्यातील शेतकर्‍यांना बसत आहे. राज्यसरकारचा प्रशासनावर वचक नसल्याचा आरोप शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केला आहे. विषप्रकरणावरून जिल्ह्यात नाराजीचा सूर उमटत आहे. शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनीही याप्रकरणी तहसीलदार भोसले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच याप्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.