“आगामी विधानसभा निवडणुकीत २५ जागा हव्या”, पिरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे

0
58

गोंदिया : ज्या देशांनी निवडणूक प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या उद्देशाने ई.व्ही.एम. उपकरणे तयार केली आहेत, आता त्या देशांमध्ये मतदान प्रक्रियेसाठी या ईव्हीएम मशीनचा वापर करण्याऐवजी बॅलेट पेपरद्वारे निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. त्याच धर्तीवर भारतातही ईव्हीएम मशीन वापरण्याऐवजी बॅलेट पेपर वर मतदान घ्यावे, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे. आणि ईव्हीएम मशीनवर अनेक आरोप-प्रत्यारोपही विविध पक्षाकडून केले जात आहेत. त्यामुळे भारतातही यावर बंदी घालावी आणि मतदानाची प्रक्रिया बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी मागणी पिरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.जोगेंद्र कवाडे यांनी गोरेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत पिरिपा २५ जागांची मागणी महायुतीपुढे ठेवणार आहे. नुकताच लागू करण्यात आलेला हिट अँड रन कायदा वाहनचालकांवर अन्याय करणारा काळा कायदा ठरत आहे. या कायद्यात सुधारणा करून वाहनचालक व मालकाला न्याय द्यावा. आमचा पक्ष पिरिपा राज्यातील शिंदे सरकारसोबत आहे, पण आंबेडकरांची विचारधारा आम्ही बदललेली नाही बदलणार ही नाही. त्यामुळे तरुण पिरिपाच्या विचारसरणीशी जोडले गेले आहेत. आणखी या विचारधारेशी तरुणांना जोडण्यासाठी राज्यात सामाजिक यात्रेचे आयोजन करण्यात येत असून, त्याचा समारोप नागपुरातील दीक्षाभूमी येथे होणार आहे. राज्य सरकार विकास कामांमध्ये अग्रेसर भूमिका बजावत आहे. शिंदे सरकार शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावात काम करत आहे.पत्रपरिषदेत पिरीपा जिल्हा प्रभारी महेंद्र नागदेवे, जिल्हाध्यक्ष राजू भेलावे, जिल्हा उपाध्यक्ष कोळेश्वर लेडे, जिल्हा सचिव जियालाल पटले, सुंदरलाल लिलारे, सुनील भालाधरे, श्याम सुंदर बसोद, रतनकुमार वैद्य, जय मेश्राम, दिलीप पाटील, रॉबिन भंवरजार, योगिता भंवरे आदी उपस्थित होते.