भंडारा : एकीकडे राज्यात सर्वत्र महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यासाठी महायुतीतील तीनही पक्षांचे नेते एकत्र येत असून जागा वाटपात पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य, असे सांगत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल हे मात्र भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे दिसून येत आहे. तीनही पक्षाचे प्रमुख एकत्रितपणे हा निर्णय घेतील असे बोलतानाच भंडारा-गोंदिया मतदार संघातून लढण्याचा निर्णय घेतल्यास आम्हाला तयारीची गरज नाही असेही ते म्हणाले. त्यामुळे या मतदासंघावर आता अजित पवार गट दावा ठोकणार का अशा चर्चांना ऊत आलेला आहे.
या मतदारसंघातून मी अनेक वर्ष खासदार म्हणून निवडून आलो आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी नेहमीच मजबूत राहिली आहे. आमचा पक्ष विदर्भात विशेषतः भंडारा गोंदिया मतदारसंघात सर्वाधिक बळकट आहे. त्यामुळे ती जागा आणि मागितल्यास त्यात काहीच वावगे ठरणार नाही. शिवाय या मतदार संघात मी अनेक कामे केली आहेत, प्रतिनिधीत्व केलं त्यामुळे माझ्या तयारीचा प्रश्नच उरत नाही. मी सदैव तयार असतो. विदर्भात आम्हाला जागा हव्या आहेत असेही ते म्हणाले.प्रफुल्ल पटेल म्हणाले की, भंडारा जिल्हा मतदारसंघ आणि माझं नातं वेगळा आहे. विदर्भात सगळ्यात बळकट राष्ट्रवादी ही गोंदिया भंडारा जिल्ह्यात आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ही राष्ट्रवादीला मिळणे अपेक्षित आहे. मी भंडारा- गोंदियासाठी आग्रह केलेला नाही पण जेव्हा तयारीची गोष्ट करता ३६५ दिवस गोंदिया -भंडाऱ्याच्या संपर्कात असतो. त्यामुळे त्यासाठी मला वेगळं काम करण्याची गरज नाही.