“वंचितला सोबत न घेतल्यास काँग्रेस नेते तुरुंगात जातील,” अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

0
5

अमरावती : वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत युती करण्यास तयार आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरून काँग्रेसने वंचित आघाडीला दूर ठेवले आहे. वंचितला सोबत न घेतल्यास तुमची सत्ता येणार नाही आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधींपासून इतर अनेक काँग्रेस नेते तुरुंगात दिसतील, असा सूचक इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे जाहीर सभेत बोलताना दिला. महाविकास आघाडीसोबत युती झाली नाही, तर वंचित आघाडी लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

येथील सायन्स कोर मैदानावर आयोजित जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसोबतच काँग्रेसवरही जोरदार शरसंधान केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन दोन वर्षे उलटली, तरी तीन पक्षांमध्ये जागा वाटपाचे धोरण ठरले नाही. महाविकास आघाडीला खरेच मोदी यांना पराभूत करायचे आहे का, असा प्रश्न पडतो. काँग्रेसने वंचित आघाडीला लोकसभेच्या दोन जागा देण्याची तयारी दाखवली आहे, पण त्या जागा कोणत्या हेही सांगण्यास ते तयार नाहीत. काँग्रेसला युती तोडण्यासाठी कुणीतरी बळीचा बकरा हवा आहे आणि तो होण्याची आमची इच्छा नाही.वंचितची सत्ता आल्यास कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नोकरी आणि कापसाला पाचशे रुपये क्विंटल बोनस देण्याची जुनी व्यवस्था पुन्हा आणण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन फुंडकर आदी उपस्थित होते.

शरद पवार माध्यमांशी बोलून कुणाला फसवित आहेत

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली. आम्ही प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेणार, असे वक्तव्य पवारांनी केले, पण प्रसार माध्यमांशी बोलून ते कुणाला फसवित आहेत. हीच चर्चा त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्याशी करावी, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला.