अध्यक्ष प्रा. श्रावण देवरे यांची घोषणा!
अहमदनगर– ओबीसी समाजाचे आरक्षण संपल्यागत जमा असतांना आता, राजकीय आरक्षण देखील संपुष्टात आलेले आहे. यासोबतच खोटी कुणबी प्रमाणपत्रे मराठा समाजाला दिली जात आहेत, त्यामुळे उद्याच्या नोकरभरतीमध्ये खऱ्या ओबीसींना डावलून खोटे कुणबी प्रमाणपत्र असणार्या मराठा समाजाच्या उमेदवारांना नोकऱ्या मिळणार आहेत. त्यातून खऱ्या ओबीसी उमेदवारांना डावलून त्यांच्या न्याय-हक्कांवर गदा येणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला आपले आरक्षण वाचवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागणार आहे, त्यासाठीच ‘ओबीसी राजकीय आघाडी’च्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 व विधानसभेच्या 288 जागा जागा लढवणार असल्याची घोषणा ओबीसी राजकीय आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्रावण देवरे यांनी केली आहे.
अहमदनगर शहरातील हॉटेल प्रभा पॅलेस, बुरूडगाव रोड येथे 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीसाठी 21 जानेवारी रोजी बैठक संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करतांना प्रा. देवरे बोलत होते. यावेळी सुर्यभान गोरे, अनुरिता झगडे, अंबादास गारुडकर, भगवानराव फुलसुंदर, बाळासाहेब भुजबळ, संजय कानडे, अनिल ईवळे, सुधाकरराव कानडे, प्रा. निळकंठ विधाते, लवेश गोंधळले, मच्छिंद्र बनकर सर, कुणाल अहिरे यांच्यासह अनेक मान्यवर ओबीसी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत अहमदनगर व शिर्डी लोकसभा व सर्व विधानसभा निवडणुका ओबीसी राजकीय आघाडीतर्फे लढविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. उमेदवार निवडीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी 10 सदस्यांची समिती नेमण्यात आली तसेच लवकरच ओबीसी राजकीय आघाडीच्या लोकसभा दक्षिण आणि उत्तरेच्या उमेदवारांची घोषणा पत्रकार परिषद घेऊन करणार असल्याचे प्रा. देवरे यांनी स्पष्ट केले.
ओबीसींच्या नोकर्या धोक्यात…
मराठ्यांना देण्यात आलेल्या खोट्या कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसींच्या सरकारी नोकर्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात ओबीसी समाजातील तरूणांना शिपाईची देखील नोकरी मिळणे मुश्कील होणार आहे. कारण मराठा समाजाला खोटे कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे ते साहजिक ओबीसी प्रवर्गांवर दावा करणार आहेत. त्यामुळे ओबीसींच्या नोकर्या धोक्यात येतांना दिसून येत आहे. यासाठी ओबीसी विचारांचे, जातनिहाय जनगणनेची मागणी करणारे आमदार-खासदार विधानसभा आणि लोकसभेत निवडून आले पाहिजेत, तरच ओबीसी समाजाला न्याय मिळेल. प्रस्थापित मराठ्यांच्या व ब्राह्मणांच्या मालकीच्या राजकीय पक्षातून निवडून आलेले ओबीसी आमदार-खासदार कूचकामी ठरलेले आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाने एकत्र येत ओबीसी राजकीय आघाडीतर्फे उभ्या असलेल्या आपल्या ओबीसी उमेदवारालाच निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मार्गदर्शन यावेळी प्रा. श्रावण देवरे यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना केले.