मोदींशिवाय देशाला दुसरा पर्याय नाही : खा. प्रफुल्ल पटेल

0
8
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया —पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती होत आहे. गत दहा वर्षात त्यांनी उत्तम योजना राबविल्या. प्रत्येक घटकापर्यंत योजना पोहोचल्या.
आज मोदींची जनतेत वेगळीच प्रतिमा आहे. त्यांच्या नेतृत्वात देश यशोशिखर गाठत आहे. विरोधकांकडे मुद्दे व अजेंडा नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला दुसरा पर्याय नाही, असे मत राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.

ते शनिवार 27 जानेवारी रोजी स्थानिक नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात राष्ट्रवादीच्या मेळावा प्रसंगी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना बोलत होते. पटेल पुढे म्हणाले, आपण जबाबदार नेते आहोत. भंडारा-गोंदिया लोकसभेच्या जागेबद्दल आता बोलणे सोयीस्कर होणार नाही. लवकरच महायुतीची बैठक होणार आहे. बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल. त्यानंतरच राज्यातील जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. येथील जनतेला माझ्या प्रती आपुलकी आहे, त्यांच्या अपेक्षाही असणे स्वाभाविक आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या नेत्याला तिकीट मिळावी ही अपेक्षा असतेच. विदर्भात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात राष्ट्रवादीची ताकद आहे. मात्र आपण या जागेवर दावा सांगू शकत नाही.

व्यक्तीशी टिकीट मागणार नाही, मात्र पक्षासाठी आग्रह मात्र करू शकतो असेही ते म्हणाले. मोदींना पर्याय असूच शकत नाही. मोदी ही व्यक्ती नसून एक विचार आहे. एक संकल्पना आहे. ही गोष्ट ज्यांना समजली, त्यांना मोदी समजले असे म्हणावे लागेल. आज देशातच काय विदेशातही मोदींचा डंका आहे. जनतेत त्यांच्या प्रति आकर्षण आहे. गतकाळात देशाने खूप प्रगती केली, त्यांच्यात सक्षम नेतृत्व व सर्वांना घेऊन सर्वांगीण विकास साधण्याची किमया असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या 45 जागा जिंकू असा विश्‍वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला. यावेळी आमदार मनोहर चंद्रीकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.