भंडारा-गोंदिया मतदारसंघात पटेलामुळे नव्हे तर भाजपातील इच्छुकामुळेच फसला पेच….

0
45

गोंदिया(खेमेंद्र कटरे) : आज लोकसभा 2024 च्या निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्याने खर्या अर्थाने निवडणुकीच्या जल्लोषाला सुरवात झाली आहे.मात्र भाजप व काँग्रेसकडून पाहिजे त्याप्रमाणात उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नाही.महाराष्ट्रात भाजपने 20 उमेदवारांची यादी जाहिर केली.परंतू काँग्रेससह इतर पक्षानी आपल्या उमेदवारांच्या नावावर मंथनच सुरु ठेवले आहे.पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या नितीन गडकरींना दुसर्या यादीत भाजपला स्थान द्यावे लागले.मात्र भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघाच्या नावावर मात्र ते शिक्कामोर्तब करु शकले नाही.खरं तर 2014मध्ये मोठ्याने पराभव पत्करल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी लोकसभेची निवडणुक लढविण्याचा विचारच केला नाही.कारण त्यांना विधानसभेतून राज्यसभेत जाण्याची संधी उपलब्ध झाल्याने.या दोन्ही जिल्ह्यात जरी त्यांचे राजकीय वजन असले तरी हा मतदारसंंघ खरा भाजपच्या ताब्यातच आहे.त्यामुळे पटेलामुळे या मतदारसंघाच्या नावावर शिक्कामोर्तब अडकल्याची जी चर्चा सुरु आहे.त्या चर्चेलाच काही अर्थ नसून भाजपच्या उमेदवारामध्ये असलेल्या चुरसीमुळे आणि स्थानिक व बाहेरच्या या दोन मुद्यामुळेच खरं तरं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला नावावर शिक्कामोर्तब करण्यात अडचण चाललीय.राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेलांना निवडणूक लढवायची नसली तरी त्यांनी शेजारचा गडचिरोली चिमूर मतदारसंघ राष्ट्रवादीला हवा यककरीताच जोर लावलेला आहे.आणि हा मतदारसंघही भाजप पुर्व विदर्भात राष्ट्रवादीला देण्याच्या मानसिकतेत असल्याचे चित्र आहे.जवळपास राष्ट्रवादीने आपल्या ज्या 6 उमेदवारांची नावे निश्चित केली,त्यामध्ये धर्मरावबाबा आत्राम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले आहे.

भाजपने आपल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर केली.यात विदर्भातील गडचिरोली,भंडारा-गोंदिया,बुलढाणा,अमरावती व यवतमाळ सोडले.भाजपने जे उमेदवार जाहीर केलेत त्यावरुन पुर्व विदर्भात त्यांनी तेली समाजाला वर्धा,ब्राम्हण समाजाला नागपूर,कोमठी(आर्य वैश्य)समाजाला चंद्रपूर हे मतदारसंघ निश्चित केले.पुर्व विदर्भात कुणबी व पोवार समाजाला प्रतिनिधीत्व मिळालेलं नाही.त्यामुळे भाजप भंडारा-गोंदिया मतदारसंघात कुणबी की पोवार काय निवडते यावरही तिकिट वाटपांच घोंडं अडून बसलंय खरं तर.त्यातच भाजपमध्ये खरी लढाई उमेदवारीकरीता विद्यमान खासदार सुुनिल मेंढे व नागपूर निवासी माजी विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके यांच्यातच आहे.फुके यांनी आपली पुर्ण शक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून लावलेली दिसून येत आहे.त्यातच प्रफ्रुल पटेलांचे पारडं कुणाकडे झुकतं ते खरं महत्वाचं राहणार आहे.महायुतीच्या जागावाटपाच्या नव्या फॉर्म्युलानुसार भाजप 30, राष्ट्रवादी काँग्रेस ७ आणि शिवसेनेच्या वाट्याला 11 जागा येण्याची शक्यता आहे. मात्र, अजित पवार गट आणखी दोन जागांसाठी अडून बसला आहे. अजित पवार गटाने आता एकूण 9 जागांची मागणी लावून धरली आहे. यापैकी 6 जागांवरील उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचे हे 6 उमेदवार निश्चित

रायगड :- सुनिल तटकरे
बारामती :- सुनेत्रा पवार
शिरूर :- शिवाजीराव आढळराव पाटील
सातारा :-रामराजे नाईक निंबाळकर
धाराशीव :-दाजी बिराजदार
परभणी :-राजेश विटेकर

या तीन जागांसाठी या नावांवर राष्ट्रवादीचा आग्रह

गडचिरोली :-धर्मरावबाबा आत्राम
नाशिक :- समीर किंवा छगन भुजबळ
बुलढाणा :-डॉ. राजेंद्र शिंगणे

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीत भंडारा गोंदिया मतदार संघाच्या उमेदवाराचे नाव जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यात समावेश नसल्यामुळे या मतदार संघातील इच्छुक उमेदवारांसह मतदारांचाही भ्रमनिरस झाला.अशातच समाज माध्यमांवर मात्र या इच्छुक उमेदवारांचे समर्थक आणि कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्यांपुढे “भावी खासदार” असे लिहून मिरवायला लागलेत.तर दुसरीकडे मोदीजी सै बैर नही…..लेकी ………तेरी इसबार खैर नही…असेही स्लोगन समाजमाध्यमावर भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यापासून पदाधिकारीपर्यंत लिहित असल्यानेच पक्ष नावावर शिक्कामोर्तब करण्यात घाई करीत नसल्याची खरी वस्तूस्थिती आहे.

तर दुसरीकडे महविकास आघाडीलाही या मतदारसंघात तगडा उमेदवार शोधण्यास यश मिळत नाहीयं,ही खऱी बाब आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना लोकसभा लढवायची ईच्छा नसून त्यांना साकोलीतूनच विधानसभेत जाण्याची ईच्छा आहे.त्यामुळे या मतदारसंघात महायुतीच्या विरोधात महाआघाडीचा जो कुणी उमेदवार पटोलेव्यतिरिक्त असेल तो नामधारीच राहणार हे तेवेढं खरं आहे.दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेसच्या पक्ष संघटनेकडे बघितल्यास एकाही जिल्हाध्यक्षांने बुथलेवलपर्यंत काम केल्याचे दिसून येत नाही.परंतु उमेदवारीकरीता जे नावे समोर येत आहेत,त्या नावांचा वलय त्यांच्या गावाशेजारीच असून तालुक्याच्या काय तर जिल्ह्याच्या बाहेरही दिसून येत नसल्याने दोन्ही जिल्ह्यात ज्याच्या नावाचे वलय असेल अशा उमेदवाराच्या शोधात महाआघाडीतील काँग्रेस नेत्यांना परिश्रम घ्यावे लागत आहेत.त्यामुळे या निवडणुकीत महाआघाडी महायुतीला खरंच तोडीचा उमेदवार देणार काय हे सुध्दा बघावं लागणार आहे.