पुर्व विदर्भातील पाचही लोकसभा मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्येच थेट सामना

0
12

गोंदिया,दि.31 : भाजपसह शिंदेसेनेचाही उमेदवार ठरविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी केलेली तडजोड, नाना पटोलेंनी भंडारा-गोंदियात दिलेला नवखा उमेदवार,रामटेकमध्ये काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरी, गडचिरोली चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवारांना करावी लागणारी कसरत, महायुतीचा झेंडा उंचावण्यासाठी प्रफुल्ल पटेलांना करावी लागणारी धडपड, ही या निवडणुकीची वैशिष्ट्ये ठरणार आहेत. थोडक्यात काही मतदार संघाचा घेतलेला थोडक्यात आढावा.

*भंडारा-गोंदियात थेट लढत

भंडारा-गोंदियात विद्यमान खा. असलेले भाजपचे उमेदवार सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यातच सामना आहे.बसपने भाजपच्या भंडारा जिल्हा महामंत्री यांना उमेदवारी दिल्याने ते कितपत मते वळते करतात याकडे लक्ष लागले आहे.त्यातच काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी अपक्ष रिगंणात उडी घेतल्याने ते काँग्रेस उमेदवाराला किती फटका देतात हे पुुढे दिसणार असले तरी सध्याच्या घडीला काँग्रेस व भाजपमध्येच खरी लढत आहे.त्यातच मोहाडीतील धार्मिक कार्यक्रमात नेहमीप्रमाणे धिरेंद्रमहाराज यांनी आपल्या वादग्रस्त शैलीने परमात्मा एक सेवक धर्माचे जुमदेवबाबा यांच्याबद्दल केलेली अपमानास्पद टिका ही भाजपला डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

*नागपुरात गडकरी विरुद्ध ठाकरे

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी व काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्यामध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात सामना होत आहे.गेल्यावेळी नाना पटोले यांचा पराभव झाला व गडकरी २ लाख १६ हजार मतांनी विजयी झाले होते. पटोले बाहेरचे असूनही त्यांनी चार लाखांवर मते घेतली होती.विशेष म्हणजे मी निवडणुकीचा प्रचार करणार नाही,मला मते द्यायची की नाही ते तुम्ही ठरवा असे म्हणणारे भाजप उमेदवार गडकरी प्रचारातून अगदी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. तर काँग्रेस एकदिलाने रिंगणात उतरली आहे. या मतदारसंघात वंचितने काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला असला, तरी त्यांची मते कुठे वळणार, याबद्दल तर्क-विर्तक लढविले जात आहेत.

* गडचिरोली-चिमुरात खरा सामना भाजप-काँग्रेसमध्ये

गडचिरोली-चिमूरमध्ये पारंपरिक पद्धतीने काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत होत आहे. भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते, तर काँग्रेसकडून डॉ. नामदेव किरसान हे नशीब आजमावत आहेत. २०१९ मध्ये वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार डॉ. रमेश गजबे यांनी १,११,४६८ इतकी मते घेतली होती. यावेळी वंचित’ने नवा चेहरा दिला आहे. बहुजन समाज पार्टीनेही उमेदवार दिला असला, तरी खरा सामना भाजप-काँग्रेसमध्येच होईल,असे चित्र आहे.यामध्ये आदिवासी मतांचे विभाजनात काँग्रेस नेत्याला किती फटका उसेंडी यांच्या भाजप प्रवेशाने बसतो हे महत्वाचे राहणार आहे.

चंद्रपुरातही दुहेरी सामना

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात काँग्रेसला विजय देणारा एकमेव चंद्रपूर मतदारसंघ यावेळीही लक्षवेधी आहे. काँग्रेसच्या आमदार प्रतीभा धानोरकर यांची लढत भाजपचे मंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्याशी आहे. गेल्यावेळी वंचितने तब्बल लाखांवर मतांचे विभाजन घडवूनही दिवंगत बाळू धानोरकर यांचा ४४ हजार ७६३ मतांनी विजय झाला होता. यावेळी वंचितचे राजेश बेले रिंगणात आहेत. भाजप आणि काँग्रेसने ही लढत प्रतिष्ठेची केल्याने चुरस वाढली आहे.काँग्रेस नेते विजय वड्डेटीवाराकरीता हा मतदारसंघ महत्वाचा राहणार आहे,कारण धानोरकर व वड्डेटीवार यांच्यातील मतभेद आणि वड्डेटीवार समर्थकांचे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील नेते भाजपमध्ये प्रवेश घेत असल्याने काँग्रेस उमेदवारावर किती प्रभाव पडतो हे बघावे लागणार आहे.मुनगंटीवार विकासाच्या नावावर मत मागत असले तरी त्यांच्याच मतदारसंघात बेरोजगारांची मोठी फौज अनेक वर्षापासून उभी झाली आहे.

*रामटेक लोकसभेत पारवेविरुद्ध बर्वे

-रामटेक मतदारसंघात काँग्रेसच्या उमदेवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने त्यांच्या जागी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे महाआघाडीच्या वतीने रिंगणात आहेत. महायुतीमध्ये शिदेसेनेकडे गेलेल्या या मतदारसंघात भाजपच्या पुढाकारातून काँग्रेसचे आमदार राजू पारवे उमेदवार आहेत. माजी मंत्री सुनील केदार यांची कोंडी करण्यासाठी आमच्या आमदाराला फोडले, असा आरोप करीत काँग्रेस जिद्दीने रिंगणात उतरली आहे. बसपाकडून जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, तर वंचित बहुजन आघाडीकडून शंकर चहांदे रिंगणात आहेत. काँग्रेसचे किशोर गजभिये यांनी केदार यांनी आपला विरोध केल्याचा राग मनात ठेवून बंडखोरी करून अर्ज कायम ठेवला आहे.