नातेवाईक असलेल्या भाजप उमेदवाराच्या विजयासाठी पटोलेंनी दिला डमी उमेदवार

0
20

गोंदिया,दि.31ः भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर 18 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांच्याही त्यात समावेश असून त्यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले आहे.माजी आमदार वाघाये यांच्यानुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यवसायिक रुप घेऊन तिकिटाचे वितरण केले.काँगेसने दिलेला उमेदवार हा डमी असून विधानसभा निवडणुकीत तो 2000मताच्यावर आकडा पार करु शकला नाही.त्यातच भाजपचे उमेदवार व विद्यमान खासदार सुनिल मेंढे हे पटोलेंचे नातेवाईक असून आपल्या नातेवाईकाच्या विजयाकरीताच डमी  उमेदवार दिल्याचा आरोप वाघायेंनी केला आहे.

भाजपचा नातेसंबंधातील उमेदवार असलेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघात नाना पटोलेंनी डमी उमेदवार दिल्याचा आरोप माजी आमदार सेवक वाघाये यांनी केला आहे. याद्वारे त्यांनी आपल्या आमदारकीची डील केल्याचाही आरोप वाघाये यांनी केला आहे.महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुनील मेंढे हे पटोलेंचे नातेवाईक आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी पटोले यांनी डमी उमेदवार दिला आहे. २०१४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढलेल्या डॉ. प्रशांत पडोळे यांना २००० मते पडली होती. त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्याने कधी पंजा हातात घेतला नाही, कधी काँग्रेसचा प्रचार केला नाही की झेंडा हातात घेतला नाही.सुधाकर गणगणेंना पाडल्यामुळे विलासराव देशमुखांनी नाना पटोले यांना पक्षातून काढले होते. १० वर्षांनी ते परत काँग्रेसमध्ये आले आणि राहुल गांधी, सोनिया गांधींना फारशी माहिती नसल्याने त्याचा गैरफायदा ते घेत आहेत. आम्ही पक्ष उभा केला, नानांमुळे पक्ष संपायला लागला आहे, असा आरोप वाघाये यांनी करीत आपण काँग्रेसची अस्मिता वाचविण्याकरीता रिंगणात असल्याचे म्हटले आहे.