खासदार मेंढे यांना गावगाड्यातून विरोध; प्रचार न करताच परतण्याची नामुष्की

0
16

भंडारा,दि.१०-: भंडारा-गोंदिया लोकसभेची निवडणूक पहिल्या टप्प्यात अर्थात १९ एप्रिल रोजी होत आहे. महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यात अटीतटीची लढत होईल, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या दोन्ही उमेदवारांचा प्रचार जोमात सुरू असला तरी खासदार मेंढे यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. हा अनुभव एकट्या गोंदिया जिल्ह्यात नव्हे तर भंडारा जिल्ह्यातही त्यांना आला. प्रचार न करताच त्यांना परत जाण्याची नामुष्की ओढवली. खासदार मेंढेजी तुम्ही आलात, तसे परत जा, असे म्हणत गावकरी त्यांना अक्षरशः हाकलून लावत आहेत.
खासदार असतानाही सुनील मेंढे यांनी खुर्चीच्या मोहापायी भंडारा नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही. कंत्राटदार असलेल्या मेंढे यांनी नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत कोट्यवधींची माया जमवली. म्हणूनच की काय खासदार होऊनही त्यांना हे पद सोडावेसे वाटले नसावे. खासदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी लाखांदूर तालुक्यातील जैतपूर हे गाव दत्तक घेतले. खासदार दत्तक गाव असताना किमान या गावात तरी विकासाची गंगा यायला पाहिजे होती, पण तसे झाले नाही. गावात रुपयाचा निधी खर्च न करणाऱ्या खासदाराला मग गावकरी धडा शिकवतील नाही त का? याचा अनुभव कालपरवा आलाच. विकासाचा आणि वचननाम्याचा रथ घेऊन मेंढे जैतपुरात पोहोचले. हनुमान मंदिराशेजारी त्यांची प्रचारसभा होती. महायुतीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले; खरे परंतु, क्षणात त्यांना एकवटलेल्या गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. खासदार मेंढे विकास दाखवा, अन्यथा चालते व्हा, असा संतापजनक सूर गावकऱ्यांचा होता. त्यामुळे त्यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला. पवनी तालुक्यातील आसगाव हे त्यांचे गृह गाव… या गावातही त्यांना प्रचंड विरोध आहे. गावचा पोरगा खासदार झाल्यावर विकासाच्या अपेक्षा गावकरी गावच्या पोराकडून करणार नाही तर कोणाकडून करणार? मात्र, या पोराने स्वतःचाच विकास केला. आम्हाला काय हवे…मूलभूत सुविधाच न? पण तेही होत नसेल तर त्याला धडा शिकवावाच लागेल.