भाजपाने ४०० जागांऐवजी संसदच ताब्यात घ्यावी,पण विरोधकांचाही सन्मान ठेवावा-खासदार गजानन किर्तीकर

0
6

मुंबई-भाजपाने यंदा ‘४०० पार’ असा नारा दिला आहे. त्यांनी ४०० जागांऐवजी संसदच ताब्यात घ्यावी, पण दुसऱ्या बाजूला विरोधकांचाही सन्मान ठेवावा, अशा शब्दात गजानन किर्तीकर यांनी भाजपावर शरसंधान साधले. विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे, ही भाजपाने आणलेली नवी संस्कृती असल्याचेही किर्तीकर यावेळी म्हणाले.

मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाने अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. अमोल किर्तीकर यांच्यावर करोना काळात खिचडी वाटपात गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला अमोल किर्तीकर यांचे वडील विद्यमान खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात गेलेले आहेत. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत गजानन किर्तीकर यांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार करू, असे दोनच दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र काल (दि. १३ एप्रिल) गोरेगावमध्ये झालेल्या एका प्रचारसभेत त्यांनी मुलगा अमोल किर्तीकर यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा निषेध केला. तसेच पंतप्रधान मोदींवर शरसंधान साधले.

“भाजपाने आणलेली संस्कृती घातक आहे. आता ४०० पारचा नारा दिला जात आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्हीही पुढाकार घेऊ. पण भाजपाची वृत्ती त्यांना अडचणीत आणणारी आहे. अमोलवर खिचडी घोटाळ्याचा आरोप केला जातो. पण त्या कंपनीची स्थापना संजय माशेलकरने केलेली आहे. करोना काळात हे लोक सामाजिक कार्य करत होते. जम्बो हॉस्पिटलची संकल्पना समोर आल्यानंतर त्यासाठी साहित्य पुरविण्याचे काम माशेलकर यांच्या कंपनीने केले. त्यामध्ये अमोल आणि सूरज यांचा सहभाग नाही. त्यांनी सप्लाय चेनमध्ये मदत केली. यात कोणताही घोटाळा नाही. अमोलला त्याचं मानधन मिळालं. त्यावर प्राप्तिकरही लागला”, अशी माहिती गजानन किर्तीकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

किर्तीकर पुढे म्हणाले, अमोल किर्तीकर यांनी मनी लाँडरिंग केलेले नाही. तरीही त्यांना त्रास देण्याचं कारण काय? तर ते उबाठा गटात आहेत. भाजपा नेते सांगतात खिचडी वाटपात घोटाळा झाला. ईडीचे अधिकारी सांगतात, या आरोपात काही दम नाही. चौकशी झालेली आहे. पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगितले गेले आहे कारण यात कोणताही फौजदारी खटला नाही. आम्ही मोदींचं नेतृत्व स्वीकारलेले आहे. त्यांनी संपूर्ण लोकसभाच ताब्यात घ्यावी. पण मित्रपक्षांचाही मान राखला गेला पाहीजे, याचीही काळजी घ्यावी.