जलजीवन मिशन ठरले कर्दनकाळ, अवकाळी पावसाने मुख्य डांबरी रस्ता चिखलमय

0
2

गोंदिया : हर घर नल हर घर जल चा नारा देत मोठा गाजावाजा करत जलजीवन मिशनचे काम सर्वत्र सुरू करण्यात आले.मात्र सदर मिशन अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.तालुक्यातील ग्रामपंचायत कोसमतोंडी येथील जलजीवन मिशनच्या कामातून दिसून येते.गावात दोन-तीन महिन्यापासून जलजीवन मिशनचे काम सुरू असून कंत्राटदाराने काम सुरू झाल्यानंतर जुन्या जलवाहिनीची तोडफोड करून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजुला खोदकाम करून पाईपलाईन केली.पण खोदकाम करून पाईपलाईन केल्यानंतर दोन्ही बाजुच्या पाईपलाईन योग्य त-हेने न बुजविता मातीचे सपाटीकरण केले नाही.त्यामुळे ११एप्रिल रोजी रात्री आलेल्या अवकाळी पावसाने डांबरी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.सदर डांबरी रस्ता आहे की चिखल मातीचा रस्ता आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे.या मुख्य रस्त्याने चारचाकी व मोठे वाहन तसेच दुचाकी व पायी जाणा-यांना मोठी कसरत करावी लागत आहे.कंत्राटदारांचे ढिसाळ व मनमर्जी कारभाराने कोसमतोंडी गावातील ग्रामपंचायत ते मुरपार रस्त्याची ऐशीतैशी झाली आहे.मात्र याकडे स्थानिक ग्रा.प.प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.जलजीवन मिशनचे काम करणा-या कंत्राटदारांने मुख्य डांबरी रस्त्याची जलवाहिनीच्या कामासाठी खोदकाम करतांनी विल्हेवाट लावली आहे.अवकाळी पावसाने रस्त्यावर संपूर्ण चिखलाचे साम्राज्य पसरले असून रस्त्याचे दोन्ही बाजुला जडवाहन,चारचाकी,दुचाकी वाहन व पायी चालणा-या नागरिक रस्त्याचे बाजुला झाल्यास चिखलात फसल्याशिवाय राहणार नाहीत. गायी,म्हशी व गुरेढोरे चिखलात फसले आहेत.मात्र याबाबत कंत्राटदाराला बोलायला कुणीही तयार नाही.कंत्राटदाराने मुख्य रस्त्याची ऐशीतैशी केली असून सर्वसामान्य नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.मात्र ग्रा.प.पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना काही देणघेण नाही.सदर कंत्राटदारांने मुख्य रस्त्याची वाट लावली आहे.मात्र ग्रा.प.प्रशासन मूंग गिळून गप्प आहे.अवकाळी पावसाने मुख्य डांबरी रस्त्यावर चिखल पसरले असून गावातील जलजीवन मिशनच्या कामामुळे रस्ता कर्दनकाळ ठरलेला आहे.