पराभव दिसताच मोठे नेते मैदानात, खासदार मेंढेंना शहा-नड्डाचा टेकू

0
17

गोंदिया-भंडारा मतदार संघातील उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली

गोंदिया : गोंदिया-भंडारा लोकसभा संघात मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे उमेदवार आणि नेत्यांच्या हृदयाची धडधड वाढताना दिसत आहे. अर्थात मतदानाचे कॉऊंट डाऊन सुरू झाल्याने प्रचाराचा धुराळा ही जोमात उडविला जात आहे. गेल्या वीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या मतदार संघात ‘कमळ’ विरुद्ध ‘पंजा’ अशी थेट लढत बघावयास मिळत आहे. कॉंग्रेसचा किल्ला नवखे असलेले डॉ. प्रशांत पडोळे लढवत असले तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे रिंगणात आहेत. उल्लेखनीय म्हणजे भाजप ४०० पारचा नारा छातीठोकपणे लावत असली, तरी या मतदार संघात निष्किय खासदारामुळे मतदारांपुढे नाक घासण्याची वेळ वरिष्ट नेत्यांवर आल्याचे आल्याचे बोलले जात आहे. भाजपला पराभव टप्प्यात दिसत असल्याने मोठे नेते मैदानात उतरविण्याशिवाय पर्याय उरला नाही. अगदी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे पासून तर राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना भर उन्हात तापून निघावे लागत आहे. अशात चुकून भाजपचा विजय झालाच तर पुन्हा एकदा एक निष्क्रिय खासदार जनतेच्या बोकांडी बसविला जाणार, अशा चर्चा जोरात असून मोदी-शहाच्या नावावर गोंदिया-भंडाराकरांच्या गळ्यात एक धोंडा तर बांधला जाणार नाही ना, असा यक्षप्रश्न मतदारांना पडला आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभेची निवडणूक पहिल्या टप्प्यात अर्थात १९ एप्रिल रोजी होत आहे. महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यात चुरशीची लढत होईल, हे तितकेच खरे आहे. मात्र, गावागावांत खासदार मेंढे यांना होणारा विरोध पाहता भाजपला दिल्लीतल्या मोठ्या नेत्यांना भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात प्रचारासाठी मैदानात उतरावे लागले.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची निवडणूक १९ एप्रिलला होणार आहे. १८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत महायुतीचे उमेदवार खासदार सुनील मेंढे व काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्यातच होणार आहे. दोघांचाही प्रचार जोमात सुरू असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यांच्या प्रचाराकडे किंबहुना आरोप-प्रत्यारोपाकडे कार्यकर्ते वगळता मतदारांना लक्ष देण्यात अजिबात वेळ नाही. यातही महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना गावागावांत विरोध होत आहे. विकास दाखवा, असे म्हणत प्रचारापासून रोखत आहेत.

हा अनुभव एकट्या गोंदिया जिल्ह्यात नव्हे तर भंडारा जिल्ह्यातही त्यांना आला. प्रचार न करताच त्यांना परत जाण्याची नामुष्की ओढवली. खासदार मेंढेजी तुम्ही आलात, तसे परत जा, असे म्हणत गावकरी त्यांना अक्षरशः हाकलून लावत आहेत. मतदारसंघातून जवळपास ३५ गावांत त्यांना परतून लावण्यात आले. त्यामुळे पराभवाच्या छायेत आलेल्या मेंढे यांना टेकू देण्यासाठी दिल्लीतल्या नेत्यांना भंडारा-गोंदिया मतदार संघात यावे लागले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी अशा मोठ्या नेत्यांनी सभा गाजवली. सभेत १०० ते २०० रुपये रोजी देऊन गर्दी करण्यास सांगण्यात आले होते. सर्कस ग्राउंडवर झालेल्या सभेत उपस्थित राहण्यासाठी आणि रॅलीत सहभागी होण्यासाठी केवळ १०० रुपये दिल्याचे काही महिलांनी सांगितले.
खासदार सुनील मेंढे यांच्या नशीबाला साथ म्हणजे उर्वरित १६ उमेदवार कॉंग्रेसची किती मते फोडतात, यावर सुद्धा भाजपच्या विजयाचे गृहीत धरले जात आहे. संविधान बचावचा नारा देणारी वंचित बहुजन आघाडी सुध्दा कॉंग्रेसच्या मताला सुरुंग लावण्यात किती यशस्वी होते, हे मतमोजणी नंतर समोर येईल. इतर उमेदवार हे सुद्धा अप्रत्यक्षरीत्या भाजपलाच रसद पुरविणार असल्याचेही एकंदर चित्र आहे. परिणामी, एकूण १७ उमेदवारांचा सामना कॉंग्रेसचे डॉ. पडोळे कसा करतात, यावर सुद्धा खा. मेंढेंचा विजय अवलंबून आहे. भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांचे प्रामाणिक प्रयत्न यावर या मतदारसंघातील निकाल प्रभावीत होणार आहे. जर कॉंग्रेसने प्रचारातील ढिसाळपणा सोडला नाही तर पुढील पाच वर्षे या मतदारसंघातील नागरिकांना विकासासाठी दिल्लीश्वरांच्या मर्जीवर राहावे लागणार, हे मात्र नक्की.