महाराष्ट्रात मोदींच्या सभा झालेल्या 18 पैकी 15 उमेदवारांचा पराभव

0
17

लोकसभा निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाला आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू काही चालली नाही. मोदींच्या सभा महाराष्ट्रात फेल ठरल्या. 18 पैकी 15 उमेदवारांच्या नशिबी पराभव आला. देशात एनडीएला 293 तर इंडिया आघाडीला 232 जागा मिळाल्या. दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला.राज्यात महायुतीला केवळ 18 जागा मिळाल्या. तर, महाविकास आघाडीने जवळपास 30 जागा काबिज केल्या. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील फटका बसला. महायुतीकडून काही जागांसाठी तर भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं.

माढा, बीड, सोलापूर येथे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा गाजल्या होत्या. भाजपकडून इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला म्हटल्यावर या जागा महायुती जिंकेल, असं म्हटलं जात होतं. पण, निकाल याउलट आला.

चंद्रपूर : मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातही मोदींची सभा झाली. पण, येथे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला. मुनगंटीवार यांचा तब्बल 2,60,406 मतांनी पराभव झाला.

रामटेक : काँग्रेसमधून शिंदे गटात आलेले राजू पारवे यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली होती. मात्र, येथे देखील काँग्रेसचे शामकुमार बर्वे जिंकले.

वर्धा : वर्धा मतदारसंघात भाजपचे रामदास तडस यांच्यासाठी नरेंद्र मोदी आले होते. येथे शरद पवार गटाचे अमर काळे यांनी बाजी मारली.

बीड : बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींनी सभा घेतली होती. पण, येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली.

नांदेड : भाजपवासी झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हा जिल्हा. भाजप उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्यासाठी येथे मोदी यांनी सभा घेतली होती. पण, काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी विजय मिळविला.

सोलापूर : भाजप उमेदवार राम सातपुते यांचा इथं पराभव झाला. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी येथे बाजी मारली. सोलापूरमध्ये देखील मोदी यांनी सभा घेतली होती.

कोल्हापूर : कोल्हापुरात शिंदे गटाचे संजय मंडलिक हे (Lok Sabha Result 2024) निवडणूक लढवत होते. येथेही मोदींची सभा झाली. मात्र, काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी दीड लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला.

परभणी : महादेव जानकर यांच्यासाठी मोदींनी येथे सभा घेतली होती.या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय जाधव यांनी लाखांहून अधिक मतांच्या फरकानं जानकरांना पराभूत केले.

माढा : माढा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी मोदींची सभा झाली. मात्र, शरद पवारांच्या धैर्यशील मोहिते-पाटील यांनी हे मैदान गाजवलं. त्यांचा विजय झाला.

यासोबतच धाराशिव, लातूर, नंदुरबार आणि अहमदनगर या ठिकाणी देखील नरेंद्र मोदी यांनी जंगी सभा घेतल्या होत्या. मात्र, येथे विरोधकांचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे यंदा मोदींची जादू फोल ठरली, असं म्हटलं जातंय.