बदलत्या समीकरणात आमदार कोरेटेंची अग्निपरीक्षा

0
90

■ विद्यमान आमदार कोरोटे यांच्यासाठी आकडेमोड महत्त्वाची ठरणार.

सुरेश भदाडे

देवरी,ता.१०: अनुसूचित जमातीकरीता राखीव असलेल्या देवरी-आमगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात होतो.आगामी विधानसभेची निवडणुकचा विचार करता नुकतीच पार पडलेली लोकसभेची सार्वत्रिक निवडणुक ही त्यांच्यासाठी जणू रंगीत तालीमच होती. परिणामी, आपल्या मतदार संघातून काँग्रेस उमेदवाराला जास्तीत जास्त मते मिळावी, त्याचा फायदा येत्या विधानसभा निवडणुकीत व्हावा, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून विद्यमान आमदार सहषराम कोरेटे यांनी प्रचार, जनसंपर्क, पक्षबांधणी केली. राजकारणाच्या बदलत्या समीकरणात ही त्यांची अग्निपरीक्षाच ठरली. लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशावरून आता आमदार कोरोटे यांचे विरोधक कमालीचे अस्वत्थ झालेले दिसून येत आहेत.
आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघ परिसिमनानंतर देवरी, सालेकसा आणि आमगाव या तीन तालुक्यांचा समावेश गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाला करण्यात आला. हा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. परिसीमनानंतर या मतदारसंघाने तीन आमदार दिले. त्यात स्व.रामरतन राऊत व सहषराम कोरोटे या काँग्रेसच्या तर भाजपचे संजय पुराम या आमदारांचा समावेश आहे. सद्यःस्थितीत सहसराम कोरेटे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

 गेल्या २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कांग्रेसचे सहसराम कोरेटे यांनी भाजपचे संजय पुराम यांना पराभूत करीत ८८ हजार २६५ मते घेऊन विजयी झाले. आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आली. आगामी निवडणुकीत स्वतःचे जनमत साबूत ठेवण्यासाठी सहसराम कोरेटे यांनी काँग्रेसचे लोकसभासाठी उमे‌दवार नामदेव किरसान यांना आपल्या मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी अक्षरशः जीवाचे रान केले होते. तीनही तालुक्यांत प्रचाराचा धुराळा उडाला. लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी जी ताकद खर्ची घातली, त्याचा फायदाही  पक्षाला नक्कीच झाल्याचे दिसून आले.
या मतांच्या आधारावर आगामी विधानसभा निवडणुकीत कुठे, किती मते कमी आणि जास्त पडली, याची समीक्षा देखील करता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात फेरबदल होण्याची शक्यता निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. अशाही स्थितीत आकलनामुळे हुरळून न जाता जमिनीस्तरावर प्रचार आणि जनसंपर्क करून आपली मते साबूत राहावीत, ज्या ठिकाणी काँग्रेसची स्थिती कमकुवत होती, अशा ठिकाणी मोर्चे बांधणी करणे यालाच त्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले. ती एक प्रकारची अग्निपरीक्षाच होती. लोकसभा निवडणुकीत आता मिळालेल्या यशानंतर आता विधानसभेची तयारी सुरू होईल. विद्यमान आमदार कोरोटे यांच्यासाठी आकडेमोड महत्त्वाची असणार आहे.
महत्वाचे म्हणजे विरोधक सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या करिष्मावर अवलंबून विजयाप्रती आश्वस्त होते. मात्र, यावेळी मतदारांनी लोकशाहीत जनताच राजा ठरवित असते, हे सिद्ध करून दाखविले. फाजील आत्मविश्वास विरोधकांना या निवडणुकीत नडला. यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी विरोधकांमध्ये जे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार बसले आहेत, त्यांची झोप सुद्धा या निवडणुकीच्या निकालाने उडविली आहे. परिणामी, आगामी विधानसभा सुद्धा निवडणुक सुद्धा जरी चुरशीची दिसत असली, तरी विद्यमान आमदारांचे पारडे सध्या तरी जड वाटत आहे.