■ गोटाबोडीच्या सरपंचाकडून शासकीय निधीचा गैरव्यवहार.
■ गोटाबोडी ग्रामपंचायतचे उपसरपंच दीपक बावनथडे यांचा आरोप
देवरी,दि. १५ : देवरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गोटाबोडी या गट ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात २०२१-२३ या कालावधीत झालेली विकासकामे ही निकृष्ठ दर्जाची आहेत. या कामासाठी आलेल्या निधीचा गैरवापर सरपंच मनोहर जनू राउत यांनी केल्याचा आरोप खुद्द उपसरपंच दीपक बावनथडे यांनी केला आहे.
सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील गट ग्रा.पं. गोटाबोडी येथे सन २०२१ ते २०२३ दरम्यान झालेली विकास कामे निकृष्ट दर्जाचे आहेत. विकास कामाकरिता आलेल्या निधीचा सरपंच मनोहर जनु राऊत यांच्याकडून गैरवापर होत असून लाखो रुपयाची अफरातफर केली सरपंचांनी केली आहे. या गैरव्यवहाराची वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब चौकशी करावी. या प्रकरणी सरपंच व त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करा अशी मागणी गोटाबोडी ग्रामपंचायतचे उपसरपंच दीपक बावनथडे यांनी केले आहे.
सन २०२१ ते २०२३ दरम्यान झालेल्या विकास कामाची तक्रार उपसरपंच दीपक बावनथडे यांनी ४ महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी गोंदिया, मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया तसेच आपले सरकार तक्रार पोर्टलकडे केली आहे. दि. २० मार्च २०२४ रोजी भिसाजी जोईल (कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन) व दि.१९ मार्च २०२४ रोजी भैय्यासाहेब बेहेरे (उपजिल्हाधिकारी रोहयो गोंदिया), यांनी स्मरणपत्र दोन वेळेस जि.आर. खामतर (उपमुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद गोंदिया) यांना दिले. त्यावर अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी व कार्यवाही केल्याचे तसा अहवाल सादर करावेत असे आदेश गटविकास अधिकारी पंचायत समिती देवरी यांना दिले. मात्र मागील तीन महिन्यापासून या प्रकरणाची कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. ग्राम पंचायत गोटाबोडी अंतर्गत झालेल्या दर्जाहीन कामांची चौकशी टाळण्यात आली. कोणताही अहवाल सादर न करता गट विकास अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करीत, केराची टोपली दाखविली आहे. असा आरोप उपसरपंच दीपक बावनथडे यांनी केला आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
गोटाबोडी ग्रामपंचायत अंतर्गत दाखल झालेल्या तक्रारीचे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन केलेले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून येत्या दोन ते तीन दिवसात चौकशी अहवाल सादर करण्यात येईल.
◆ श्री झामरे,
विस्तार अधिकारी, पं.स. देवरी