मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर तीन नेत्यांमध्ये मध्यरात्री खलबते;अडीच तास चालली बैठक

0
131

मुंबई:- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी दिल्ली दौरा केला. त्यात महाविकास आघाडीची रणनीती ठरवण्यात आला. त्यानंतर मुंबईत महायुतीने गुरुवारी मध्यरात्री बैठक घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षाची बैठक झाली. सुमारे अडीच तास तिन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत खलबते झाले.

त्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा रणनीती निश्चित करण्यात आली. तिन्ही पक्षाकडून सामूहिक सभा, दौरे आणि मेळावे घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीचे रणशिंग येत्या २० ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथून फुंकण्यात येणार आहे. वर्षा बंगल्यावरील बैठक गुरुवारी रात्री ११ ते १.३० पर्यंत सुरु होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरल्याची माहिती मिळाली आहे. मेळावे, सभा आणि संवाद दौरे आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक मतदार संघावर लक्ष ठेऊन रणनीती तयार केली जाणार आहे. येत्या २० तारखेपासून तिन्ही नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार रात्री ११ वाजता पोहचले. त्यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु झाली. या बैठकीत ७ विभाग आणि २८८ विधानसभेत एकाच दिवशी विभागनिहाय संवाद दौरे, लाभार्थी यात्रा व सभा आयोजित करण्याबाबत निर्णय झाला. तसेच ७ विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा होणार आहेत. २० ऑगस्ट रोजी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कोल्हापूर येथून जाहीर सभेने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकंले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच झटका बसला होता. या निवडणुकीत महायुतीला ४८ पैकी केवळ १७ जागांवर विजय मिळवता आला होता. महाविकास आघाडीने ३० जागा आणि महाविकास आघाडीतील बंडखोर अशा ३१ जागांवर वर्चस्व निर्माण केले होते. त्यामुळे आता महायुतीने अधिक जोराने काम सुरु केले आहे.