स्वातंत्र्यदिनाआधी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला;पुणे ISIS मॉड्यूलच्या म्होरक्याला दिल्लीत अटक

0
74

3 लाखांचं बक्षीस असणाऱ्या दहशतवाद्याला अखेर अटक

मुंबई:-स्वातंत्र्यदिनाआधी राजधानी दिल्लीमध्ये दहशतवाद्यांचा कट उधळण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इसीसच्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून एका दहशतवाद्याला अटक केली आहे. रिझवान अब्दुल हाजी अली असे दहशतवाद्याचे नाव असून त्याच्यावर 3 लाख रुपयांचे बक्षीस होते.

‘इंडिया टूडे‘ने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी पहाटे पुणे ISIS मॉड्यूलचा प्रमुख सदस्य रिझवान अब्दुल हाजी अली याला अटक केली. त्याच्यावर 3 लाख रुपयांचे बक्षीस होते. रिझवान अब्दुल हाजी अली हा पुणे ISISI मॉड्यूलचा कुख्यात दहशतवादी असून त्याच्या अटकेसाठी एनआयएने वॉरंटही जारी केले.

गतवर्षी पोलिसांनी पुणे ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. तेव्हापासून रिझवान अब्दुल हाजी अली हा फरार झाला होता. तो दिल्लीतील दर्यागंज येथील रहिवासी असून इतर सहकाऱ्यांसह त्याने दिल्लीसह मुंबईतील अनेक हायप्रोफाईल भागांची रेकी केली होती. आता त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून शस्त्रेही जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.