
आमगाव,दि.१६ः-गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ नामदेवराव किरसान यांच्या आमगाव कार्यालयात गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.बैठकीत काँग्रेस पक्षाची संघटना अधिक बळकट करण्यासाठी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. आगामी काळात गावपातळीपासून बूथ स्तरापर्यंत पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच जनतेच्या समस्या, शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्षाने प्रभावीपणे आवाज उठवावा, यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमरभाऊ वराडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाची विचारधारा, संघटनात्मक शिस्त आणि जनसंपर्क वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेशी थेट संपर्क ठेवून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.
बैठकीत उपस्थित प्रदेश सचिव.पी.जी कटरे , तालुका अध्यक्ष संजय बहेकार खासदार प्रतिनिधी दुष्यंत किरसान. शहर अध्यक्ष देवकांत बहेकार, जगदीश भाऊ फुंडे, बाबा मिश्रा, युवक काँग्रेस आमगाव विधानसभा अध्यक्ष राहुल चुटे ,माजी जिल्हा सचिव गौरव बिसेन,महेश उके, प्रभाताई उपराडे , छबू उके,गीता महारवाराडे , मीनाक्षी महारवाराडे,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी कार्यक्रम, सदस्य नोंदणी अभियान, संघटन विस्तार आणि पक्ष बळकटीकरणाबाबत आपली मते मांडली. पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करून आगामी काळात काँग्रेस पक्षाला अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.बैठकीस उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करून काँग्रेस पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्याचा तसेच जनहिताच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याचा संकल्प व्यक्त केला.




