अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात बडोले-बनसोड की चंद्रिकापूरेसोबत होणार लढत

0
819

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सस्पेन्स अजूनही कायम आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी आपले उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत, ज्यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण तंग झाले आहे. २०१९ च्या निवडणुकीत स्वतंत्र लढलेले पक्ष आता एकत्र आले असले, तरी तिकीट वाटपावरून तणाव वाढला आहे.

भाजपमधील राजकुमार बडोले यांचा उमेदवारीवर दावा

wartaa rajkumar badole

भाजपच्या उमेदवारीसाठी माजी मंत्री आणि दोन वेळा आमदार राहिलेले राजकुमार बडोले यांनी आपला दावा ठोकला आहे. बडोले २००९ आणि २०१४ मध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या रामलाल नंदागवळी यांचा १६,३०७ मतांनी पराभव केला होता. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रिकापुरे यांनी केवळ ७१८ मतांनी विजय मिळवला होता. पराभवानंतरही बडोले यांचा जनसंपर्क कायम राहिला असून, त्यांनी आता पुन्हा एकदा निवडणुकीत उतरायची तयारी केली आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मकता आहे, आणि अनेकांना विश्वास आहे की बडोले हेच भाजपचे उमेदवार असतील.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रिकापुरे यांचा उमेदवारीवर जोर

दुसरीकडे, विद्यमान आमदार चंद्रिकापुरे यांची देखील उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना २०१९ मध्ये उमेदवारी दिली होती, आणि त्यांनी ती संधी साधत विजयी कामगिरी केली होती. चंद्रिकापुरे यांचा कार्यकाल बऱ्यापैकी  राहिला असून, त्यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी ऐनवेळी सुगत चंद्रिकापूरे किंवा इंजि.यशवंत गणवीर यापैकी एक चेहरा राहू शकतो.

महाविकास आघाडीत तिकीटावरील तणाव

महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये तिकीट वाटपावरून पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसकडून दिलीप बन्सोड आणि अजय लांजेवार यांची नावे चर्चेत आहेत, तर राष्ट्रवादीकडून चंद्रिकापुरेच उमेदवार असतील, अशी जोरदार चर्चा आहे. आघाडीत तिकीट कुणाला मिळणार यावर अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही, ज्यामुळे निवडणुकीतील सस्पेन्स आणखी वाढला आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी आपल्या उमेदवारांना तिकीट देण्याचा आग्रह धरला असून, राष्ट्रवादीने आपल्या जागेचा दावा केला आहे. त्यामुळे आघाडीत तिकीट वाटपावरून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

भाजपमध्ये बडोलेंची उमेदवारी नक्की की बंडखोरीचा धोका?

भाजपकडून राजकुमार बडोले यांच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चा असली, तरी अंतिम घोषणा झालेली नाही. त्यामुळे बडोले यांना तिकीट न मिळाल्यास बंडखोरीची शक्यता व्यक्त केली जात आहे. बडोले हे भाजपचे जुने आणि प्रभावी नेते असल्याने त्यांची उमेदवारी नक्की होईल, असा अनेकांचा अंदाज आहे. मात्र, तिकीट न मिळाल्यास ते पक्षात बंडखोरी करतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

राष्ट्रवादीत मिथुन मेश्रामची तयारी

राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) मिथुन मेश्राम यांनीही आपल्या समर्थकांसह मतदारांमध्ये संवाद साधत उमेदवारीची तयारी सुरू ठेवली आहे. शरद पवार यांची भेट घेत, त्यांनी आपली स्थिती मांडली असून तिकीट मिळण्यासाठी प्रयत्नशील असले तरी त्यांच्यात उमेदवारी झेलण्याइतपत राजकीय परिपक्वतेचा अभाव स्पष्ट दिसून येतो.मात्र, महाविकास आघाडीत कोणाला तिकीट मिळणार, याचा अजूनही निर्णय झालेला नसला तरी ही जागा कॉंग्रेसलाच जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसकडून उमेदवारीसाठी अनेक शर्यतीत

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार निवडीवर मोठी चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत पक्षाच्या तिकिटासाठी अनेक दावेदार रिंगणात उतरले आहेत, त्यामध्ये अजय लांजेवार यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहे.मात्र निष्टावंतामध्ये राजेश नंदागवळी व निशांत राऊत हेच खरे कॉंग्रेसचे उमेदवार मानले जातात.

अजय लांजेवार हे अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील एक प्रमुख चेहरा असून, त्यांनी यापूर्वी विविध राजकीय पक्षांतून निवडणुका लढवल्या आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये त्यांनी अनेक पक्षांचे झेंडे हातात घेतले असून, यामुळे त्यांच्याकडे मतदारांचा बघण्याचा दृष्टिकोन अविश्वासाचे आहे.स्वत:च्या व्यवसायिक लाभाकरीता राजकीय पक्ष बदलण्याची कला हेच यांचे राजकिय प्रभाव होय.