* ओबीसी व पोवार समाजाचा चेहरा म्हणून सुरेश चौधरी रिंगणात
* ‘अग्रवाल हटाव ‘ मोहिमेचा सुरेश चौधरींना होणार फायदा?
गोंदिया – गोंदिया 65 मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार असलेले सुरेश (नानू) चौधरी यांना मनसेने ओबीसी व मतदार संघातील बहुसंख्य मतदार असलेले पोवार समाजाचा चेहरा म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे. आधीच ‘अग्रवाल’ विरोधातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समर्थन त्यांना प्राप्त होत असल्याने सध्या तरी मनसेचे ‘ इंजिन ‘ रुळावर धावत असल्याने ते कुणाचे गणित बिघडवणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.
गोंदिया विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त पोवार समाजाची व त्यानंतर कुणबी समाजाची मते असूनही भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्यांच्या पक्षातील ओबीसी चेहऱ्यांना डावलून ‘ अग्रवाल ‘ यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे बहुजन लोक फक्त सतरंज्याच उचलणार काय? असा प्रश्न करून ओबीसी समाजातील नेत्यांनी विरोधही केला होता. अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोवार समाजाचे ओबीसी नेते सुरेश चौधरी यांना उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले होते.परंतु मनसेच्या काही नेत्यांच्या पोटात मात्र गोळा तयार झाला आहे. त्यामुळे भाजप व काँग्रेस मधील नाराज असलेले ओबीसी नेत्यांचा छुपा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. शहरातील वा शहरालगत असलेल्या ओबीसी समाज जागृत असल्याने सध्यातरी मनसेचे इंजिन रुळावर असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत निवडणुकीच्या दिवसापर्यंत त्यांच्या पारड्यात किती मते जातात व ते कुणाचे गणित बिघडवणार हे मात्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.