SAANS Campaign प्रभावीपणे राबविण्याबाबत :- जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते

0
17

भंडारा, 14 :- देशात एकुण बालमृत्युच्या 17.5 टक्के बालमृत्यु हे न्युमोनियामुळे होतात. बालकांमध्ये होणाऱ्या न्युमोनिया या गंभीर आजाराची व्याप्ती लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 0 ते ५ वर्षे वयोगटातील न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यु कमी करण्यासाठी SAANS  Initiative हा कार्यक्रम जिल्हयात दि.12 नोव्हेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदर कालावधी दरम्यान SAANS Campaign जिल्हयात प्रभावीपणे राबविणे, न्यूमोनिया पासून संरक्षण, आजाराचा प्रतिबंध व उपचार या विषयी प्रमुख संदेशांचा प्रचार व प्रसार, जन-सामान्यांमध्ये न्यूमोनिया विषयक जनजागृती करणे याबाबत मा.जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते, यांनी जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या सभेत निर्देशीत केले. सदर सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिपचंद सोयाम, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.सचिन चव्हाण, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.मधुकर कुंभरे उपस्थित होते.

            जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.मनिषा सकोडे यांनी जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या सभेत SAANS कार्यक्रमाचे मुख्य ध्येय व उध्दिष्ट – सन 2025 पर्यंत बालकांमधील न्युमोनियामुळे होणाऱ्या बालमृत्युचे प्रमाण दर हजारी जिवंत बालकांमध्ये 03 पेक्षा कमी करणे, नॅशनल चाईल्डहूड न्युमोनिया मॅनेजमेंट 2019 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे, बालकांमधील न्युमोनियाचा प्रतिबंध व बचाव करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सामाजिकस्तरावर जनजागृती करणे, न्युमोनिया आजार ओळखण्याबाबत पालकांना/काळजी वाहकांना सक्षम बनविणे, न्युमोनिया आजारास गंभीरपणे घेण्यासाठी तसेच वेळेत उपचार / काळजी घेण्यासाठी न्युमोनिया आजाराविषयी असलेले गैरसमज व चूकीच्या कल्पना दूर करुन पालकांना/काळजी वाहकांच्या वर्तणूकीत बदल करणे, “न्युमोनिया नाही तर बालपण सही” या घोषवाक्याचा वापर SAANS Campaign मध्ये करण्यात यावा.  पीपीटी ॲप्रोच पध्दती – संरक्षण (प्रोटेक्ट), प्रतिबंध (प्रिव्हेंट) आणि उपचार (ट्रीट) म्हणजेच पीपीटी हस्तक्षेपांची पुरेशा प्रमाणात आणि सुयोग्य अंमलबजावणी झाली तर न्युमोनियामुळे होणारे मृत्यु टाळता येतात याबाबत माहिती दिली.

          जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या सभेत शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा माहिती अधिकारी, समाजकल्याण विभाग, आयसीडीएस विभाग, आयएमए, आयएपी, वैद्यकिय अधिक्षक (ग्रामिण/उपजिल्हा रुग्णालय), तालुका आरोग्य अधिकारी पं.स., सार्वजनिक आरोग्य परिचारीका सरिता निर्वाण, अनिता मानकर उपस्थित होते.