गोरेगाव बाजार समिती उपसभापती हरिणखेडेच्या निलंबनावरून वादंग; षड्यंत्राचा आरोप
गोरेगाव,दि.२२:विधानसभा निवडणूकीकरीता मतदान पार पडताच गोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तेंजेंद्र हरिणखेडे यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत मतदानापुर्वीच्या तारखेत पत्र काढून समाजमाध्यमावर प्रसारीत करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.त्यावरुन बाजार समितीचे उपसभापती तेजेंद्र हरिणखेडे यांनी भाजपच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आपण कुठलेच पक्षविरोधी काम केलेले नसतांना निलबंनाचा व्हायरल होत असलेला पत्र हा भाजपच्या एका नेत्याने रचलेले षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.तर २०१५ मध्ये भाजपच्या एका नेत्याने आपल्या मुलासह भाजप उमेदवाराच्या विरोधात खुलेआम करीत काँग्रेसच्या पंजा करीता मतदान मागितले होते,तेव्हा हे नेते कुठे गेले होते,असा सवाल करीत एकप्रकारे भाजपच्या स्वार्थी राजकारणाची पोलखोलच हरिणखे़डेने केली आहे.
त्या पत्रात पक्षविरोधी काम केल्याचा आरोप करत निलंबन आदेश जारी करण्यात आला असला तरी हा आदेश वैयक्तिक व्देष आणि राजकीय षड्यंत्रातून काढण्यात आल्याचा आरोप केला आहे. निलंबन आदेशात नमूद तारीख १५ नोव्हेबंर असून तो पत्र मात्र भाजप तालुकाध्यक्षांने २१ नोव्हेबंरला प्रसारीत केल्याने,सहा दिवस आधीचा पत्र का आधी का दाबून ठेवण्यात आला होता अशा प्रश्न आता सामान्य कार्यकर्तेही विचारू लागले आहेत. हा आदेश नियोजित पद्धतीने आणि षड्यंत्र रचून काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
२०१४ आणि २०१५ च्या घटनांचा दाखला
आक्षेप घेताना समर्थकांनी २०१४ आणि २०१५ मधील घटनांचा दाखला दिला आहे. त्यांनी सांगितले की, २०१४ मध्ये भाजपच्या उमेदवार अलका पारधी यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तत्कालीन तालुका अध्यक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी काम केले होते. यावेळी पक्षविरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
तसेच, २०१५ मध्ये सोनी जिल्हा परिषद निवडणुकीत काही भाजप नेत्यांनी पक्षाच्या विरोधात प्रचार केला होता. नमक व जल कसम देत भाजपविरोधी भूमिका घेतल्याचे त्या वेळी समोर आले होते, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता अचानक पक्षविरोधी कामाचा ठपका ठेवून निलंबन का केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील वाद
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवार तेजेंद्र हरीणखेडे यांच्या विरोधात काही भाजप नेत्यांनी काम केल्याचा आरोप आहे. ही बाब सर्व पक्षनेत्यांना माहिती असूनही त्यावेळी कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे हरीणखेडे यांच्या निलंबनाबाबत भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
तालुका अध्यक्षावर गंभीर आरोप
तेजेंद्र हरीणखेडे यांनी स्पष्ट केले की, तालुका अध्यक्षाला अशा प्रकारचे निलंबन आदेश काढण्याचा अधिकारच नाही. उलट, ज्या तालुका अध्यक्षाने निलंबनाचा आदेश जारी केला आहे, त्यानेच पक्षविरोधी काम केल्याचा आरोप हरीणखेडे यांनी केला आहे.
भाजप नेतृत्वाकडे चौकशीची मागणी
या वादामुळे तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. पक्ष नेतृत्वाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी समर्थकांनी केली आहे. तसेच, या प्रकारामुळे स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे स्पष्ट दिसत आहे.
पुढील वाटचालीकडे लक्ष
निलंबनाच्या या निर्णयामुळे गोंदिया तालुक्यात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. पुढील काळात पक्ष नेतृत्व या प्रकरणावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.