नागपूर,दि.१६ः-येथील राजभवन येथे काल 15 डिसेंबररोजी महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी महायुतीत अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रीमंडळात डच्चू देण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आले आहे. यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चेला उधाण आलंय.
भुजबळ यांना डावलण्यात आल्यानंतर त्यांचे समर्थक देखील प्रचंड संतापले आहेत. आज त्यांचे समर्थक व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिलाय. त्यातच आज माध्यमांशी संवाद साधताना स्वतः भुजबळ यांनी देखील आपण नाराज असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता ते पुढे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इतकंच नाही तर, आज दुपारी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी वैतागून आपण नाराज असल्याचे मान्य केले. होय, मी नाराज आहे, असं ते पत्रकरांना म्हणाले. तसेच मला मंत्रिमंडळात का घेतले गेले नाही, हे त्यांना विचारा. पक्षाच्या नेत्यांना विचारा. त्याचे उत्तर मी कसे देऊ, असंही संतापून भुजबळ यांनी म्हटलंय.
“…मग पुढची भूमिका ठरवेन”
यावेळी माध्यम प्रतिनिधींनी भुजबळांना आता शरद पवारांकडे जाणार का? असा प्रश्न देखील विचारला. त्यावर भुजबळ यांनी “मी 12 डिसेंबर रोजी शरद पवारांना भेटून आलो आहे” असं म्हटलं. मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यानंतर आता पुढची भूमिका काय असेल? असा प्रश्न देखील भुजबळ यांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “मी माझ्या लोकांशी बोलेन, माझ्या मतदारसंघातील जनतेशी, माझ्या कार्यकर्त्यांशी, समात परिषदेतील लोकांशी बोलून पुढची भूमिका ठरवेन” दरम्यान, आता छगन भुजबळ (chhagan bhujbal) पुढे नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.