राज्यातील तब्बल 17 जिल्हे मंत्रिपदापासून वंचित

0
117

गोंदिया/नागपूर,दि.१६ः-महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल 15 डिसेंबरला पार पडला आहे. यावेळी मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी मंत्रिमंडळात छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, दिलीप वळसे-पाटील, रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना मंत्रिपद मिळालं नाही. तर राज्यातील तब्बल 17 जिल्हे मंत्रिपदापासून वंचित राहिले आहेत.
राज्यातील मंत्रिमंडळात 39 जणांपैकी 20 नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यावेळी नागपूर येथील राजभवनाच्या प्रांगणात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा पार पडला आहे. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली आहे. तसेच फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राज्यातील 19 जिल्ह्यांमधील आमदारांना मंत्रिपद मिळालं आहे. तर राज्यातील 17 जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्त्व मिळालेलं नाही.
‘या’ जिल्ह्यांना मिळालं मंत्रिपदं :
अहिल्यानगर, पुणे, जळगाव, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, बीड, रत्नागिरी, धुळे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सातारा, रायगड, बुलढाणा, लातूर.
हे 17 जिल्हे मंत्रिपदापासून वंचित :
नंदुरबार, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, परभणी, जालना, पालघर, धाराशिव, सोलापूर, सांगली.