शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का?

0
8

नागपूर – नागपूर अधिवेशनापूर्वी शिवसेना विरोधी पक्षात होती. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेने दुष्काळी भागाचा दौरा केला होता. शिवाय आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांची भेटही घेतली होती.
शेतक-यांना एकरी १० हजार आणि हेक्टरी २५ हजारांची मागणीही केली होती. आता ही मागणी मान्य झाली नाही तर शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का? असा सवाल करत काँग्रेसचे आमदार माणिकराव ठाकरे यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. विधान परिषदेत दुष्काळावरील चर्चेला सुरुवात करताना ते बोलत होते.
राज्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या ६३ आमदारांबरोबर केली होती. इतकेच नाही तर त्यानंतर राज्यपालांचीही भेट घेतली. राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असून हे सरकार काही करत नसल्याची तक्रार केली होती. त्यामुळे या सरकारला राज्यपालांनी विशेष अधिकार वापरून दुष्काळाच्या उपाययोजना करण्यास भाग पाडावे, असे निवेदनही दिले होते.
याची आठवण यानिमित्ताने ठाकरे यांनी करून दिली. आता शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे तुम्ही या मागणीवर ठाम आहात का? ही मागणी पूर्ण होणार नसेल तर शिवसेना सत्तेत राहणार का? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.