ईव्हीएम म्हणजे ‘ईलेक्ट्रानिक वोट मॅनिप्युलेशन’-डॉ.हुलगेश चलवादी

0
18
बहुजनांचे राजकीय प्रतिनिधित्व संपवण्याचे षडयंत्र 
बसपची ‘ईव्हीएम हटाओ’ची घोषणा 

पुणे,दिनांक ६ जानेवारी-पुरोगामी महाराष्ट्रातील बहुजनांचे राजकीय अस्तित्व ‘ईव्हीएम’ अर्थात ‘ईलेक्ट्रानिक वोट मॅनिप्युलेशन’ करीत संपवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. देशातील ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ या विचारधारेला तडा देण्याचे काम तथाकथितांकडून पर्यायाने प्रस्थापित राजकीय पक्षांकडून सुरु असल्याचा दावा बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र प्रभारी,माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी आज,सोमवारी (ता.६) केला. देशातील १५% लोकसंख्या ८५ टक्क्यांवर राज्य करीत आहे. आरक्षित मतदार संघातून विशिष्ट विचारांना समर्थन देणाऱ्यांना निवडून आणले जात आहे. बहुजनातील कर्तृत्वान नेतृत्व त्यामुळे मागे पडत असल्याची खंत देखील डॉ.चलवादींनी व्यक्त केली.

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. संत परंपरेने समृद्ध झालेल्या महाराष्ट्राने अनेक सामाजिक चळवळीतून बहुजनांना न्याय देण्याचे कार्य केले आणि हे कार्य अविरतपणे सुरू आहे. पंरतु, आता बहुजन नेतृत्वाला राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी लढा उभारावाच लागेल, असे डॉ.चलवादी म्हणाले.

लोकशाहीत बहुजनांचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर ‘ईव्हीएम’ हद्दपार करावेच लागेल, अशी आग्रही भूमिका डॉ.चलवादी यांनी मांडली. ईव्हीएमच्या माध्यमातून ‘वैचारिक दहशतवाद’ पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले. ईव्हीएम वरील निवडणूक प्रक्रिया जेव्हापासून अंमलात आणण्यात आली, तेव्हापासून बहुजनांच्या राजकीय नेतृत्वाचे अस्तित्व कमी झाले आहे, असा दावा देखील डॉ.चलवादी यांनी केला. मान्यवर कांशीराम यांनी बहुजनांना सत्ताधारी बनवण्यासाठी ८५-१५ चे सूत्र देशाला दिले. या सूत्रानुसार ८५% बहुजन आणि १५% उर्वरित जातींना एकत्रित आणून ‘सोशल इंजिनियरिंग’चा प्रयोग यशस्वी केला.याच प्रयोगातून त्यांनी बहन मायावती जीं यांना तब्बल चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदी विराजमान केले.

तथाकथित मनुवादी विचारांच्या राजकीय पक्षांना हे सूत्र लक्षात येताच त्यांनी जगातील मोठमोठ्या देशांनी नाकारलेली ईव्हीएम यंत्रणा भारतात आणली.  ८५% देशवासियांचे अस्तित्व संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोप डॉ.चलवादी यांनी केला. जोपर्यंत मतप्रक्रिया ‘बॅलेट पेपर’वर राबवली जात होती, तोपर्यंत माझासारखे सर्वसामान्य नेतृत्व विजयी होत होते. पंरतु, ईव्हीएम सर्वसामान्य बहुजनांचा पराभव होतोय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.ईव्हीएम विरोधात लढा दिला नाही तर येणारा काळ लोकशाहीसाठी घातक ठरेल. ईव्हीएमच्या ‘तिमिरा’तून बॅलेट पेपरच्या ‘तेजा’कडे जायचे असेल तर एकत्रित लढा देण्याची गरज असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

अद्यापही स्पष्टोक्ती नाही!
पुणे महानगर पालिकेची २०१७ साली झालेली निवडणूक ऍड.रेणुका चलवादींनी लढवली होती.यावेळी एकूण ३३ हजार मतदान झाल्याचे प्रशासनाने सांगितले होते. पंरतु, प्रत्यक्ष मतमोजणीनंतर ४३ हजार मतदान झाल्याची बाब समोर आली. अशात हे वाढीव १० हजार मतं कुठून आले? या संदर्भात प्रश्न उपस्थित करीत जबाब विचारण्यात आला होता. मात्र, अद्यापही कुठलेही स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले नसल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.