‘गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोडणी विकास महामंडळ’

0
11

परळी-माथाडी कामगार कायद्याच्या धर्तीवर गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी विकास महामंडळ उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळीत जाहीर केला.
दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. या महामंडळाचे मुख्य कार्यालय परळीत होईल. महामंडळातूनच असंघटित ऊसतोड मजुरांचे वेतनही करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ऊसतोड मजुरांना सुखाचे दिवस यावेत, म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या नावे हे महामंडळ सुरू करतानाच ‘गोपीनाथगडा’च्या उभारणीसही राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.
विधान परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून नाव प्रस्तावित असणाऱ्या धनंजय मुंडे यांचे नाव न घेता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमात टीका केली. ‘मुंडेसाहेब जिवंत असताना त्यांची लोकांना धास्ती वाटत असे. मात्र, ज्यांचा भ्रष्टाचाराने कणा मोडला आहे, त्यांना सेनापतिपद देऊन भीती घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. परळीतील जनता त्यांना साथ देणार नाही,’ असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
‘योग्य वेळी निर्णय घेऊ’
हा धागा पकडून मुख्यमंत्र्यांनीही आता जनता व सरकार पंकजा मुंडे यांच्या पाठीशी असल्याचे आवर्जून सांगितले. राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपमध्ये आल्याचे सांगत त्यांच्यामुळेच बारामतीत निवडणूक लढविली, असे सांगितले. ते असते तर मित्रपक्षांची फरपट झाली नसती, असेही ते म्हणाले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘काळजी करू नका, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ,’ असे सांगितले