अनुदानापोटी सरकारकडून १३ व्या महिन्याचा चेक

0
11

परंडा – आधीच अस्मानी संकटाने त्रस्त आलेल्या शेतक-याला मायबाप शासनाने दुष्काळात खरोखरचा ‘तेरावा महिना’ दाखवला आहे. ठिबक सिंचनाच्या अनुदानापोटी कृषी विभागाने ७० वर्षीय साहेबा अप्पा सुरवसे (कंडारी, ता. परंडा) या शेतक-याला धनादेश दिला खरा; पण त्यावर चक्क २०/१३/२०१४ ही “अभूतपूर्व’ तारीख टाकली. कृषी अधीक्षकांच्या सहीचा हा १४,००६ रुपयांचा चेक वटवावा तरी कसा, हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

ठिबक सिंचन योजनेतील शेतक-यांचे ५० टक्के अनुदान तीन वर्षांनी, नोव्हेंबर २०१४ मध्ये आले. त्यासाठीही शेतक-यांनी कृषी विभागाचे उंबरठे झिजवले. दरम्यान, कृषी अधिकारी बी.बी. जाधव म्हणाले, अनुदानाचे चेक जिल्हा कार्यालयातून मिळतात. चेकची संख्या जास्त असल्याने त्यावरील तारीख चुकली असेल. त्याची दुरुस्ती करून देऊ, कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही.