निलम हलमारे भाजपमध्ये तर गप्पू गुप्ता जाणार राष्ट्रवादी काँग्रेस(अप) मध्ये

0
1295

गोंदिया,दि.१९ः-विधानसभा निवडणूकीत सपाटून मार खाल्यानंतर राज्यातच नव्हे तर आत्ता गोंदिया जिल्ह्यातही काँग्रेसला घरघर लागायला सुरवात झाली आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही पोस्टल मतदानातून विजय कसाबसा मिळवता आल्याने त्यांचाही मतदारसंघात आता प्रभाव राहिलेला नाही.त्यातच पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार हे निश्चित झाल्याने त्यांचे साथिदार असलेले शिलेदारही आत्ता काँग्रेस पक्ष सोडायच्या तयारीला लागले आहेत.गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव असलेले व फुलचूर जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढविलेले निलम हलमारे यांनी काँग्रेस सोडण्याच्या निर्णय पक्का केला आहे.हलमारे हे आज १९ व उद्या २० जानेवारीला आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह प्रितम लाॅन येथे आयोजित एका कार्यक्रमात आमदार विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले माजी नगरसेवक व विद्यमान जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक(गप्पू)गुप्ता यांनीही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा असून त्यांनी यासंदर्भातला आपला निर्णय काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना सुध्दा कळविल्याचेही वृत्तआहे. येत्या काही दिवसात गप्पू गुप्ता हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अप)मध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त येत आहे.