महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. “आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतंय,” या त्यांच्या वक्तव्यानं राजकारणात नवा रंग भरला आहे.
यापूर्वी अनेक आमदारांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी मतदारसंघातील प्रश्नांसाठी संपर्क साधल्याचंही समोर आलं होतं. मात्र, माध्यमांसमोर कोणीही उघडपणे भूमिका मांडली नव्हती. आता पक्षप्रमुखांनीच थेट यावर भाष्य केल्यामुळे पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
गेल्या काही महिन्यांत शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) अनेकदा एकाच कार्यक्रमात दिसून आले. वेगवेगळ्या साखर कारखान्यांच्या बैठकीत दोघांची उपस्थिती आणि झालेल्या गुप्त चर्चांमुळे एकत्र येण्याच्या शक्यतेला पुष्टी मिळाली होती. मात्र यावर अधिकृतपणे कुठलाही खुलासा नव्हता.
आता शरद पवारांनी स्वतः या चर्चांना उघडपणे वाचा फोडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आगामी काळात हे दोघे पुन्हा एकत्र येतात का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.