
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आणि विकासाला चालना देणारा आहे. या अर्थसंकल्पात सर्वप्रथम शेतकरी हिताला प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली असून वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50 हजार प्रोत्साहन रक्कम देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कृषी पंपांना वीज अनुदान आणि विविध कृषी योजनांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. गोंदिया जिल्ह्यासारख्या कृषिप्रधान भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठीही या अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य दिले जात असून हे अनुदान पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळून त्यांच्या आत्मनिर्भरतेला चालना मिळत आहे.
युवकांसाठी कौशल्य विकास, रोजगार निर्मिती आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठीही या अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नवीन उद्योग उभारणीला चालना देणे, स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे तसेच कौशल्य विकास केंद्रांद्वारे तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा ठोस प्रयत्न आहे. यामुळे राज्यातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची आणि रोजगार निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.
शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठीही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्याची योजना अधिक व्यापक करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व शैक्षणिक सुविधा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच आरोग्य क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयांची क्षमता वाढवणे, नागरिकांना परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि आरोग्य सुविधांचा विस्तार करणे हा सरकारचा स्पष्ट हेतू या अर्थसंकल्पातून दिसून येतो.
एकंदरीत हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला चालना देणारा असून राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा विश्वास आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला.





