25.3 C
Gondiā
Tuesday, September 8, 2026
Home राजकीय धानाला ३५०० रुपये क्विंटल भाव मिळालाच पाहिजे-आमदार रोहित पवार

धानाला ३५०० रुपये क्विंटल भाव मिळालाच पाहिजे-आमदार रोहित पवार

0
8

शेतकरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आक्रमक; आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात तिरोडा व अर्जुनी मोरगावात धडक जनआक्रोश मोर्चा!

गोंदिया,दि.०८ः धानाचा बोनस, सरसकट कर्जमाफी, २४ तास वीज आणि नियमित कर्जदारांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान तसेच धानाला ३५००रुपये प्रति क्विंटलचे भाव मिळालेच पाहिजे यासह विविध ज्वलंत प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तिरोडा व अर्जुनी मोरगाव येथे भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. जुनी नगर परिषद ते तहसील कार्यालयादरम्यान निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व युवा नेते आमदार रोहित पवार यांनी केले. यावेळी आयोजित सभेत रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या शेतकरीविरोधी धोरणांवर सडकून टीका करत सरकारवर जोरदार ताशेरे ओढले.

आमदार रोहित पवार म्हणाले की, “महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अभूतपूर्व संकटात सापडला आहे. सरकारने धानाला जाहीर केलेला २३९० रुपये दर अत्यंत तोकडा आणि न परवडणारा आहे. त्यातही १०० टक्के धान खरेदी न केल्यामुळे शेतकऱ्यांना ८० टक्के धान बाजारात पडक्या भावात विकावे लागले.” निवडणुकीपूर्वी एकरी २५ हजार रुपये बोनस देण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने अधिवेशनात २० हजार रुपयांची घोषणा केली; मात्र सहा महिने उलटूनही एक रुपयाचा बोनस शेतकऱ्यांच्या पदरात पडलेला नाही, असा घणाघात त्यांनी केला.blank

छत्तीसगडच्या धान खरेदी मॉडेलवर टीका करताना ते म्हणाले, “सरकारने अभ्यास करण्यासाठी छत्तीसगडला शिष्टमंडळ पाठवले, पण पुढे काय झाले? तिथे प्रती क्विंटल ३५०० रुपये दर मिळतो, मग गोंदिया-भंडारा जिल्ह्यात भाजपचेच आमदार निवडून आले असताना शेतकऱ्यांना हक्काचा बोनस का मिळत नाही?” असे सांगत भाजप नेत्यांना लक्ष्य केले. महाविकास आघाडीच्या काळात आर्थिक टंचाई असतानाही शेतकऱ्यांना ३००० रुपयांचा दर व योग्य बोनस दिला होता, याचे स्मरणही त्यांनी करून दिले.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती: जनआक्रोश मोर्चाला माजी आमदार सुनील भुसारा, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी आमदार चरण वाघमारे, युवा नेते सलील देशमुख, पंकज नाना बोराडे, रविकांत वरपे, जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यशवंत परशुरामकर, जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम, उपाध्यक्ष सुरेश खोब्रागडे, प्रहारचे महेंद्र भांडारकर, मेघा बिसेन, कैलास पटले, वनिता ठाकरे, अतुल गण्यापवार, शुभांगी राखाडे, मंजु डोंगरवार, प्रियांका मेश्राम, देवानंद तागडे, आशिष घनश्याम कापगते, मनीष मुनेश्वर, राहुल भोईर, सोनू मेश्राम, अमोल राऊत, विनोद शहारे, आदेश राऊत, बाबुलाल नेवारे यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.blank
“शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पिकाला योग्य भाव आणि हक्काचा बोनस मिळालाच पाहिजे! नियमित कर्जदारांना ५० हजार रुपये प्रोत्साहन राशी, सरसकट कर्जमाफी, २४ तास वीज, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या व युवकांचा रोजगार या मुद्द्यांवर सरकार तातडीने निर्णय घेणार नसेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून अधिक तीव्र संघर्ष करेल.”
मा. आ. रोहित पवार, युवा नेते