सबका साथ-सबका विकास हाच भाजपचा नारा

0
10

भंडारा/पवनी : सबका साथ सबका विकास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घोषवाक्य आहे, हे सार्थ करण्यासाठी आम्हाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचे सरकार असावे, असे वाटते. केंद्रात व राज्यात आम्ही सत्तेत आहोत. आमचे सरकार शेतकऱ्यांचे आहे, सर्वसामान्य जनतेचे आहे, त्यामुळे प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या भाजपला निवडून द्या, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले.

भाजपातर्फे नगरपालिका निवडणुकीतील अध्यक्ष व नगरसेवकाच्या प्रचारार्थ आयोजित भंडारा आणि पवनी येथील सभेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सत्तेत असताना आघाडी सरकारने पाणी अडवा-पाणी जिरवा हे धोरण राबविले. परंतु पाणी अडण्याऐवजी पैसाच जिरला. आमच्या सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवून नदी, नाल्यामध्ये बंधारे बांधले. कमी खर्चात जास्तीत जास्त पाणी अडवून पाणी जमिनीत जिरविण्यासाठी उपाययोजना केली.

याप्रसंगी खासदार नाना पटोले म्हणाले, भंडारा शहराचा विकास खुंटलेला आहे. पालिका भाजपच्या ताब्यात दिली तर केंद्रातील अमृत योजना यशस्वीपणे राबवून अवघ्या दोन वर्षात भंडारा शहर स्मार्ट करणार असल्याचे सांगितले. या योजनेत शहराच्या विकासासाठी जेवढा निधी पाहिजे, तेवढा निधी केंद्रातून आणणार असल्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी खासदार नाना पटोले, आ.चरण वाघमारे, आ.अनिल सोले, आ.परिणय फुके, आ.रामचंद्र अवसरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, जिल्हा महामंत्री भरत खंडाईत, धनंजय मोहोकर, भंडाऱ्याचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनिल मेंढे, पवनीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा तलमले, हंसा खोब्रागडे, के.डी. मोटघरे व पक्षाचे उमेदवार मंचावर उपस्थित होते. संचालन रामकुमार गजभिये यांनी तर आभारप्रदर्शन आबिद सिद्धीकी यांनी केले