चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला वेकोलिकडून मिळणाऱ्या कोळशात भेसळ करण्यात येत आहे. याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेचे काँग्रेस उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
यावेळी पुढे बोलताना आ. वडेट्टीवार म्हणाले, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी हा मुद्दा केंद्र स्तरावर उचलून धरावा व सरकारला सीबीआय चौकशीसाठी प्रवृत्त करावे. या कोळसा घोटाळ्यात वीज केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात गुंतले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. अवैधरित्या सुरू असलेल्या कोळसा स्टॉल्सना कुणाचा आशिर्वाद आहे, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणात कुठलीच कारवाई का करीत नाही, हादेखील प्रश्नच आहे. ताडाळी येथील एक खासगी रेल्वे साईडींग अशा घोटाळ्याचे केंद्र आहे. त्यामुळे ही साईडिंग तात्काळ बंद केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
चंद्रपूर जिल्ह्याला नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या यादीतून वगळण्यात आल्याबाबत त्यांनी राज्याचे अर्थ व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर तोफ डागली. विरोधी पक्षात असताना सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याला नक्षलग्रस्तांच्या यादीमध्ये टाकण्यासाठी वारंवार प्रयत्न केला. आता सत्तेत आल्यानंतर व मंत्री झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याला नक्षलग्रस्तांच्या यादीतून बाहेर केले. यामुळे जिल्हा नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून मिळणाऱ्या अतिरिक्त निधीपासून वंचित झाला आहे.
महाराष्ट्राला टोलमुक्त करणे शक्य नाही. भाजपा नेत्यांनी सत्ते स्थापन करण्यासाठी नागरिकांना खोटे आश्वासन दिले. मात्र स्थानिक पंजीकृत वाहनांना टोलपासून मुक्त करावे, अशी मागणीही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केली. पत्रकार परिषदेला काँग्रेस कमेटीचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, आबिद अली, दिनेश चोखारे उपस्थित होते.
या संदर्भात केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही. राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही.