‘आदर्श’ प्राथमिक आरोग्य केंद्राची गाथा पुस्तकबंद

0
19
वाढदिवसाच्या शुभेच्छा

सालेकसा : तालुक्यातील कावराबांधच्या आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्राची महती राज्यस्तरावर गेली आहे. विविध पुरस्कार पटकावलेल्या या आरोग्य केंद्राची यशोगाथा वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक अनंतवार यांनी तयार केली. त्या माहिती पुस्तिकेचे विमोचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे करण्यात आले.

या केंद्रासाठी केलेल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी तसेच आरोग्य विभागालासुध्दा ही माहिती उपयोगी पडावी या दृष्टीकोणातून प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे.

डॉ. विवेक अनंतवार यांनी माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र राज्याच्या एका टोकावरील गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये असलेल्या सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध क्षेत्रातील जनतेला सर्व प्रकारच्या उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील, अतिदुर्गम, आदिवासी क्षेत्रात जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा तसेच रुग्णांना सर्व प्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध होत आहे. आरोग्य संस्थेत १०० टक्के प्रसुती होत आहे. शासनाच्या विविध उपक्रम तसेच सर्व राष्ट्रीय कार्यक्रम व शासनाच्या येणाऱ्या विविध योजना १०० टक्के यशस्वीपणे राबवित आहे. यांच्या कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन महाराष्ट्र शासनातर्फे डॉ.आनंदीबाई जोशी राज्यस्तरीय वैयक्तिक प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

प्रा. आ. केंद्राला आदर्श करण्याचे श्रेय येथील सर्व कर्मचारी, अर्धवेळ स्त्री परिचर, परिचर यांना आहे. त्यांनी केलेले अहोरात्र परिश्रम, मेहनत, चिकाटी, मनापासून काम करण्याची इच्छा व जिद्द यामुळेच आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ, सुंदर व रमणीय झालेला असून या प्रा.आ. केंद्राने गोंदिया जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकीक मिळवला आहे. सहकारी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य पर्यवेक्षिका, आंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ता यांच्या कार्य तत्परतेमुळे शासकीय आरोग्य सेवेचे उद्दीष्ट्ये अविरत पूर्ण होत आहे.

माहिती पुस्तिकेच्या विमोचनप्रसंगी आ. डॉ. सुरेश माने, विनोद इटकलेवार, डॉ.पंकज कन्नमवार, जयंत अनंतवार, आर.एन. श्रीवास व इतर मान्यवर उपस्थित होते.