खा. राहुल गांधींची अटक हा शेतकऱ्यांच्या मुस्कटदाबीचाच प्रयत्न!: डीपी सावंत

0
6

नांदेड,दि.09:मध्य प्रदेशात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी गेलेले काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक करण्याची कारवाई म्हणजे शेतकऱ्यांच्या मुस्कटदाबीचाच प्रयत्न असल्याचे अशोक चौव्हान समर्थक आमदार डीपी सावंत यांनी म्हटले असून, या कारवाईचा तीव्र निषेध करत  व्ही आय पी रोड़वर आय टी आय चौकात पंतप्रधानांच्या प्रतिकत्मक पुतळ्याचे दहन केले यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा ही दिल्या.
या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, विद्यमान केंद्र सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने देण्यात आली होती. परंतु, आपलीच आश्वासने पाळण्यास हे सरकार साफ नकार देत आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे देशभरातील शेतकरी उद्धवस्त झाला असून, वारंवार दाद मागितल्यानंतरही कर्जमाफी व हमीभावाबाबत ठोस निर्णय घेण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याने बळीराजासमोर रस्त्यावर उतरल्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही.
काँग्रेस पक्षाने नेहमीच शेतकऱ्यांची बाजू उचलून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून आज खा. राहुल गांधी मध्य प्रदेशात गेले होते. परंतु, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेणे आणि त्याविरूद्ध आवाज उठवणे गुन्हा ठरला आहे. कदाचित त्यामुळेच खा. राहुल गांधी व इतर नेत्यांना अटक करण्यात आली. सरकारने दडपशाही करून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यात त्यांना यश येणार नाही. ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली शेतकऱ्यांची लढाई आहे आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षही सहभागी आहे. त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावेच लागेल, असेही सावंत यांनी म्हटले आहे.यावेळी राहुल गांधी जिंदाबाद च्या घोषणा दिल्या यावेळी यावेळी कांग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.