शिवसेना पदाधिकार्‍यांमध्ये ‘फ्री स्टाईल’

0
23

भंडारा : पालकमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर डॉ.दीपक सावंत यांचे गुरुवारला सायंकाळी पहिल्यांदा नगरागमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी जिल्हाभरातून कार्यकर्ते जमले होते. दरम्यान, विश्रामभवनात पदाधिकारी जमले असताना काही कारणावरुन दोन गटात ‘फ्री स्टाईल’ झाली. परंतु, पक्षाची अंतर्गत बाब समजून प्रकरण पोलीस ठाण्यातपर्यंत पोहोचले नाही. असे असले तरी या वादात ज्यांना दुखापत झाली, त्यांनी २६ जानेवारी पूर्वी संबंधितांना धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे.
जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भंडार्‍यात आले होते.पहिल्यांदा पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंद संचारला होता. त्यामुळे आपल्या नेत्याची भेट घेण्यासाठी जिल्हाभरातून कार्यकर्ते भंडार्‍यात आले होते. त्यांना येण्यासाठी विलंब असल्यामुळे कार्यकर्ते विश्रामभवनात बसले होते.
दरम्यान, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या सर्मथकांनी, ज्या भागात मताधिक्य घटले त्या भागातील पदाधिकार्‍यांना तुम्ही निष्ठावान कार्यकर्ते नसल्यामुळे दुसर्‍यांना मदत केली, असा आरोप केला. त्यावर पवनी पंचायत समितीचे उपसभापती यांच्या सर्मथकांनी तुमचा पराभव झाला, यात आमचा दोष कोणता? पदावर असताना कार्यकर्ते जोडले नाहीत. आता पराभव होताच निष्ठेचा प्रश्न तुम्हाला दिसू लागला कां? यावरुन वादावादी झाली. त्यातच एका कार्यकर्त्याने शिवा मुंगाटे यांच्या डोक्याला पाण्याची बॉटल मारली. त्यानंतर मारलेल्या जागेतून रक्त वाहू लागले. बराच वेळ ते रुमालने रक्त पुसत राहिले. यात त्यांचा रुमाल पुर्णत: भरला.
सायंकाळी पंचायत समितीचे उपसभापती शिवा मुंगाटे यांच्याकडून प्रकरण जाणून घेतले असता ते म्हणाले, पालकमंत्री येणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मी व माझे कार्यकर्ते विश्रामभवनात बसून होतो. दरम्यान, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पक्षाचे काम केले नाही, असा आरोप करुन पाण्याने भरलेली बाटली माझ्या डोक्यावर मारली. ती बाटली कपाळावर लागली. त्यानंतर रक्त वाहू लागले. पराभवाला ते स्वत: जबाबदार असताना त्याचे खापर कार्यकर्त्यांवर फोडणे चुकीचे आहे.
पदावर असताना कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले आणि आता निवडणुकीत पराभव होताच कायकर्त्याना दोष देणे हा कुठला प्रकार आहे, असे सांगून आम्ही शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत.
१९८४ पासून मी बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे. मतदारसंघ राखीव झाल्यामुळे दुसर्‍या पक्षात थारा नव्हता, म्हणून ते शिवसेनेत आले आणि आता पराभव होताच निष्ठावंत शिवसैनिकांना शिवसेनेबद्दल सांगू लागले आहेत. आम्ही कालही शिवसेनेत होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत असे सांगून आजचा कार्यक्रम पक्षाचा असल्यामुळे आज पक्षाची प्रतिमा मलीन होईल, असे काही करायचे नव्हते, परंतु निष्ठावंत शिवसैनिक कसा असतो याचा धडा शिकविल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा ईशाराच त्यांनी देऊन टाकला.