‘आॅनलाईन’ कळणार ‘पीएचडी गाईड’ची माहिती

0
17

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जास्तीत जास्त प्रमाणात ‘डिजीटल’ प्रणालीची अंमलबजावणी कशी करण्यात येऊ शकते यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. ‘पीएचडी’च्या संबंधातील बरीचशी माहिती ‘आॅनलाईन’ कळावी यासंदर्भात निर्णय घेण्यात आले. यानुसार ‘पीएचडी गाईड’ तसेच संबंधित उमेदवारांच्या प्रबंधासंदर्भात ‘आॅनलाईन’ माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

साधारणत: ‘पीएचडी’ करणाऱ्या उमेदवारांसमोर सर्वात मोठा संभ्रम असतो तो ‘गाईड’ निवडण्यासंदर्भात. एखाद्या ‘गाईड’च्या मार्गदर्शनात नेमके किती उमेदवार संशोधन करत आहेत याची माहिती नसल्याने अनेकांना ठिकठिकाणी फेरे मारावे लागतात. ही माहिती लवकरच ‘आॅनलाईन’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय संशोधन करणाऱ्या उमेदवाराची माहितीदेखील ‘आॅ़नलाईन’ देण्यात येणार आहे. यात उमेदवाराचा शैक्षणिक आलेख, प्रबंधाची नेमकी स्थिती कळणार आहे.

याशिवाय विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांचा पूर्ण ‘रेकॉर्ड’ तसेच प्रवेश तसेच परीक्षाप्रणालीची माहिती ‘आॅनलाईन’ करण्यावर भर देण्यात येणार आहे. परीक्षा संबंधीच्या माहितीचे ‘डिजीटलायझेशन’ करणे ही काळाची गरज आहे. याला पूर्ण होण्यास थोडा कालावधी लागू शकतो, पण सुरुवात झाली हे महत्त्वाचे आहे, असे मत प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केले.
परीक्षा विभागाची सुरक्षा वाढविणार

विद्यापीठाच्या परीक्षा विभागात येणाऱ्या जाणाऱ्यांची सातत्याने वर्दळ असते. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची प्रक्रिया सुरू असली तरी सुरक्षारक्षकांची येथे कमतरता आहे. इमारतीच्या प्रवेशद्वारासोबतच अंतर्गत भागातदेखील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यासंदर्भात परीक्षा विभागाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. प्रशासनाकडून यासंदर्भात लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे.

सर्व उत्तरपत्रिकांवर ‘ओएमआर’, ‘बारकोड’

विद्यापीठाने प्रत्येक उत्तरपत्रिकेवर पहिल्या पानावर ‘ओएमआर’ (आॅप्टिकल मार्क रिकग्निशन) तसेच ‘बारकोड’ रहाणार आहे. यामुळे ‘आॅनला़ईन’ मूल्यांकनाला मदत मिळेल. संबंधित उत्तरपत्रिकांचे अत्याधुनिक ‘स्कॅनर’द्वारे ‘स्कॅन’ करण्यात येईल. परंतु सुरुवातीला प्रत्येक नव्हे तर ठराविक अभ्यासक्रमांचे मूल्यांकन ‘आॅनलाईन’ होईल, अशी माहिती डॉ.चांदेकर यांनी दिली.