राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्ज मुक्ती हवी होती कर्ज माफी नको-उद्धव ठाकरे

0
26

नांदेड,दि.30 :आम्हाला शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी नको होती तर कर्जमुक्ती हवी होती म्हणुनच आम्ही सरकारला झुकवले आणि कर्जमाफी करण्यास भाग पाडले असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेडच्या शेतकरी मेळाव्यात केले.मराठवाडा दौऱ्याची सुरूवात नांदेड येथून करण्यात आली असून मालेगाव रोडवरील तरोडा भागातील भक्ती लॉन्स येथे शेतकरी संवादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमाला पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना सचिव खा. विनायक राऊत, खा. चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते लक्ष्मण वडले, आ. हेमंत पाटील, आ. सुभाष साबणे, आ. नागेश पा. आष्टीकर, आ. प्रताप पा. चिखलीकर, माजी आ. अनुसयाताई खेडकर, मनपा विरोधीपक्षनेते बंडू खेडकर, जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, भुजंग पाटील, बाबुराव कदम, जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे, धोंडू पाटील, मनोज भंडारी, नगरसेवक बालाजी कल्याणकर, उमेश मुंडे, अशोक उमरेकर, बिल्लू यादव, तुलजेश यादव, दिपकसिंह रावत यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती. प्रतिनिधी स्वरूपात पाच शेतकऱ्यांचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये बाबुराव कल्याणकर, शंकर कल्याणकर, गंगाराम कोंडे, गणपतराव गोमारे व गोपीनाथ कदम या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोगंडी व काठी देऊन भव्य असा सत्कारही करण्यात आला सुरूवातीला आ. हेमंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलत असताना म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विधीमंडळात सरकारशी भांडण करून कर्जमाफीसाठी आवाज उठविला. ऐवढेच नसून ही मलमपट्टी असून संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, कर्जमाफी नको तर हमीभाव पाहिजे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे, असे मत आ. हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी ठाकरे पुढे बोलत असताना म्हणाले, सत्तेत असतानाही आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, विरोधक असताना आम्ही राज्यभर मेळावे घेतलो आणि सत्तेत असतानाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून शासनाला कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडलो आहोत. कर्जमुक्तीचे श्रेय आम्ही नाही घेणार, घेणारे खूप जण आहेत असा टोला कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला लगावला. संघर्ष यात्रा ए.सी. गाडीत बसून केली त्यांना संघर्ष यात्रा काढायची असती तर पायी काढायची असती. शिवसेना कधीही सत्तेसाठी जगले नाहीत अन्‌ जगणारही नाही, आम्ही खुर्चीशी नाते जपणारे नसून सर्वसामान्य जनतेशी नाते जपणारे आहोत. भाजपाच्या नेत्यांनी कर्जमाफी तरच सोडाच पण शेतकऱ्यांची चेष्ठा करण्याचे काम केले. भाजपाचे मंत्री म्हणतात मोबाईलची बिल भरायला पैसे आहेत, कर्जमुक्तीही फॅशन झाली आहे असे भाजपाचे मंत्री शेतकऱ्यांची टिंगल करत आहेत. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे कर्जमुक्ती झाली आहे यामुळे हे श्रेय शेतकऱ्यांचे आहे असे ते म्हणाले. सध्या कुठेतरी बरे दिवस आले होते. नोटबंदीने तर सर्वांची वाट लावली, किती शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले हे आम्ही मोजून घेणार. कर्जमुुक्तीची जबाबदारी शिवसेना पुर्ण घेणार असून यासाठी शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या बाजुने राहणार, कर्जमुक्तीची यादी बॅंकांनी लावावी जोपर्यंत कर्जमुक्ती होणार नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरलेला शेतकरी घरी जाणार नाही असे मतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.सुरूवातीला शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी, महिला यांची उपस्थिती होती.