अध्यक्ष-उपाध्यक्ष फेरनिवडणुकीसाठी विरोधक सरसावले

0
5

गोंदिया : गोंदिया नगर परिषदेच्या तीन सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करून त्यावर पुनर्विचार करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे चार ६ आॅगस्ट रोजी घेण्यात आलेली नगर परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते पंकज यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

अपर जिल्हाधिकाऱ्यांची याचिका खारिज करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना फेरसुनावणीचे आदेश दिले आहे. सोबतच त्या अनुषंगाने परिणामकारक अधिसूचनाही रद्दबातल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे गोंदिया नगर पालिकेतील अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक प्रक्रियाही पुन्हा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ते सदस्य नगर पालिकेत पुन्हा परतले.

फेरनिवडणूक झाल्यास कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडे पुन्हा बहुमत वाढून बळकावलेली सत्ता भाजपला गमवावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुन्हा निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत.

भारतीय जनता पक्षाचे सदस्य अनिल पांडे यांनी कॉंग्रेस पक्षात परतून आलेल्या भगत ठकरानी, ममता बंसोड व निर्मला मिश्रा या तीन सदस्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यावर तत्कालीन अपर जिल्हाधिकारी कारकर यांनी तिनही सदस्यांच्या विरोधात निर्णय सुनावत त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. मात्र त्या सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत रिट याचीका दाखल केली होती. या याचिकेवर ६ जानेवारी २०१५ ला दिलेल्या निर्णयात न्यायालयाने तत्कालीन अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश रद्द करीत प्रकरणाची फेरसुनावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच त्या अनुषंगाने परिणामकारक अधिसूचनाही रद्द करण्याचे आदेश दिले आहे. येत्या ११ मार्चला सभापतींची निवडणूक होत आहे. त्यासोबतच अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी यासाठी विरोधी नगरसेवक प्रयत्नशील आहेत