गोंदिया,दि.०१ः भंडारा/गोंदिया जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था( विधान परिषद) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी आमदार दिलीप बन्सोड यांचा नामनिर्देशन अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे दाखल करण्यात आल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे बनसोड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले अनुपस्थित राहिले.त्यांनी अपक्ष उमेदवार प्रफुल अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.तर काँग्रेसकडून अर्ज दाखल करतेवेळी खासदार प्रशांत पडोळे,माजी आमदार गोपालदास अग्रवाल,भंडारा जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मोहन पंचांभाई,जिल्हाबँकेचे माजी उपाध्यक्ष राधेलाल पटले,भंडारा जि.प.चे माजी उपाध्यक्ष रमेश पारधी आदी उपस्थित होते. तर दरम्यान प्रफुल अग्रवाल यांनी भंडारा गोंदिया विधान परिषदेकरिता आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा त्यांच्या सोबत आमदार नाना पटोले अशोक गप्पू गुप्ता,महिला काँग्रेसीच्या बोरकर उपस्थित होत्या.काँग्रेस युवा नेते प्रफुल अग्रवाल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणुक रंगतदार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.





