नेत्यांनी आपसी मतभेद मिटवून पक्षाला वाढवावे-अजित पवार

0
15

नागपूर,दि.14 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत प्रदेश अध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग यांना आपसातील मतभेद मिटविण्याची विनंती केली. तुम्ही दोन्ही नेते माझे वरिष्ठ आहात. आपसात एकत्र बसा. वाद मिटवा. तुम्ही ठरवले तर जिल्ह्यात सर्व आमदार निवडून येऊ शकतात, तुमच्यात एवढी शक्ती आहे. मात्र, तुम्ही आपल्या मतदारसंघाबाहेर संघटना मजबूत करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत, अशी खंत व्यक्त करीत पक्षासाठी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येऊन काम करा, असा सल्लाही दिला.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी नागपुरात येत पक्ष संघटनेचा आढावा घेतला. शहर राष्ट्रवादीची बैठक गणेशपेठेतील पक्ष कार्यालयात तर ग्रामीण जिल्हाची बैठक गुरुदेव सेवा मंडळाच्या सभागृहात झाली. यावेळी माजी मंत्री व शहर अध्यक्ष अनिल देशमुख, माजी मंत्री व जिल्हाध्यक्ष रमेश बंग, महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, आ. प्रकाश गजभिये, आ. जयदेव गायकवाड, प्रमोद साळुंखे, ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नागपूर ग्रामीणच्या बैठकीत तटकरे चांगलेच मूडमध्ये होते. त्यांनी देशमुख- बंग या दोन्ही नेत्यांवर अप्रत्यक्षपणे नेम साधला.
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, बैठकांना महिलांची उपस्थिती कमी आहे. महिला संघटनेत अध्यक्ष व कार्याध्यक्ष अशी दोन पदे दिली आहेत. तरीही महिलांची उपस्थिती कमी आहे, याकडे लक्ष वेधत प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली. बैैठकीला ईश्वर बाळबुधे, दिलीप पनकुले, अनिल अहिरकर, सतीश इटकेलवार, धीरुभाई पटेल, महेंद्र भांगे, मुन्ना तिवारी, अविनाश गोतमारे, महादेवराव फुके, राजू राऊत, विलास झोडापे, शाम मंडपे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसची विदर्भात पाय रोवण्यासाठी धडपड सुरू असल्याचे व नेत्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असल्याचे नागपूर शहर व ग्रामीणच्या बैठकीत पहायला मिळाले. अजित पवार यांनी विदर्भात पक्ष संघटन वाढीसाठी यापुढे आपण स्वत: लक्ष देणार असल्याची हमी दिली. विदर्भात मोठी पोकळी आहे. संघटना वाढविण्यासाठी व जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. नियमित बैठका, मेळावे, सभा घेऊ असेही पवार यांनी आश्वस्त केले.