विखे पाटील यांनी सरकारला दिले ‘मी लाभार्थी’चे प्रमाणपत्र !

0
7

नागपूर. ( शाहरुख मुलाणी ) ,दि.22– भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या राज्य सरकारच्या लोकविरोधी कारभाराचा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत अनोख्या पद्धतीने निषेध केला. या सरकारचे भाजप आणि उद्धव ठाकरे हे दोघेच लाभार्थी असल्याचे सांगून विखे पाटील यांनी राज्यातील जनतेच्या वतीने त्यांना ‘मी लाभार्थी’चे प्रमाणपत्र सोपवून प्रतिकात्मक निषेध नोंदवला.यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल,आमदार विजय वड्डेटीवार,आमदार यशोमती ठाकूर आदी उपस्थित होते.
यासंदर्भात माहिती देताना विखे पाटील म्हणाले की, या सरकारचा मागील तीन वर्षांचा कारभार हा फक्त पोकळ घोषणा आणि भूलथापांचा कारभार आहे. शेतकरी आत्महत्या असो, कर्जमाफी असो, राज्यातील उद्योग व रोजगार निर्मितीचा प्रश्न असो, आरोग्य सेवा व कुपोषणाचा विषय असो, भ्रष्टाचाराविरूद्ध कारवाईचा प्रश्न असो, प्रत्येक ठिकाणी या सरकारने राज्याची दिशाभूल केली आहे. मागील ७ अधिवेशनांपासून हे सरकार हीच दिशाभूल करीत आलेले आहे. याही अधिवेशनात गंभीर व अडचणींच्या मुद्द्यांना बगल देत या सरकारने सोयीचे राजकारण केले. हे सरकार वास्तव समजून घ्यायला तयार नाही. हे सरकार स्वतः स्वतःचे कौतूक करून घेणारे सरकार आहे. या सरकारला कौतुकाचा एवढाच सोस असल्याने आम्ही या सरकारला महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने सन्मानीत केले. या सरकारचे भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे हे दोनच खरे लाभार्थी असल्याने या सरकारमधील सर्व मंत्री आणि सत्ताधारी आमदारांना आम्ही लाभार्थी प्रमाणपत्रे दिली, असे विखे पाटील यांनी सांगितले.