नाना पटोले यांचा कॉंग्रेस प्रवेश लांबणीवर

0
4

नागपूर,दि.05ः – कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर माजी खासदार नाना पटोले यांनी येत्या 12 जानेवारीपासून सुरू होणारी प्रस्तावित पश्‍चाताप यात्रा पुढे ढकलली आहे. त्याचप्रमाणे त्यांचा कॉंग्रेस प्रवेशही लांबणीवर पडला आहे.राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) येथून जयंतीनिमित्त 12 जानेवारीपासून पटोले विदर्भात पश्‍चाताप यात्रा काढणार होते. कोरेगाव भीमा दंगलीचे पडसाद राज्यभर घडू लागल्याने राज्यातील वातावरण योग्य नाही. याकाळात समाजामध्ये शांतता राखण्याची आवश्‍यकता आहे. अशा अशांत वातावरणात यात्रा काढणे योग्य होणार नसल्याने ही यात्रा पुढे ढकलण्यात येत असल्याचे पटोले यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन सुरू असल्याने नाना पटोले यांचा कॉंग्रेस प्रवेशही लांबणीवर पडला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत पटोले यांनी भेट घेतल्याची कबुली पटोले यांनी दिली. परंतु, कॉंग्रेस पक्षात आपण जाणार असलो तरी एवढ्यात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.